पोलिसांचं लाजिरवाणं कृत्य, रस्त्यावरील मृतदेह काठीने उचलून कालव्यात फेकला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 06:50 PM2023-10-08T18:50:47+5:302023-10-08T18:51:00+5:30
Bihar Police News: बिहारमधील मुझफ्फरपूर येथून पोलिसांच्या संवेदनाहीन कृतीचा प्रकार समोर आला आहे. येथील स्थानिक पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांनी पंचनामा आणि पोस्टमार्टेम यासारख्या कायदेशीर करावाया टाळण्यासाठी रस्त्यावर पडलेला एक मृतदेह काठ्यांनी उचलून कालव्यात फेकून दिला.
बिहारमधील मुझफ्फरपूर येथून पोलिसांच्या संवेदनाहीन कृतीचा प्रकार समोर आला आहे. येथील स्थानिक पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांनी पंचनामा आणि पोस्टमार्टेम यासारख्या कायदेशीर करावाया टाळण्यासाठी रस्त्यावर पडलेला एक मृतदेह काठ्यांनी उचलून कालव्यात फेकून दिला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२ वर घडली. येथे अपघाती मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर पडला होता. हा मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात पाठवण्याऐवजी पोलीस कर्मचाऱ्यांनी तो कालव्यात फेकून दिला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीच्या मृतदेहासोबत हे संवेदनाहीन कृत्य करण्यात आलं. त्या व्यक्तीचा मृत्यू हा एका ट्रकची धडक बसल्याने झाला होता. या व्यक्तीला चिरडल्यानंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला होता. मात्र या व्यक्तीचा मृतदेह पुलावरून कालव्यात फेकतानाचा पोलिसांचा व्हिडीओ काही पादचाऱ्यांनी काढला. त्यानंतर तो व्हायरल करण्यात आला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता लोक कारवाईची मागणी करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी चर्चा सुरू झाल्यावर पोलिसांनी सदर मृतदेह कालव्यातून बाहेर काढून पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवला. एसएसपी राकेश कुमार यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडीओची तपासणी केली जात आहे. तसेच या प्रकरणी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.