माणुसकिला काळिमा फासणारी घटना; चक्क बिबट्याल शिजवून खाल्ले, दोघे अटकेत...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 04:22 PM2024-11-20T16:22:31+5:302024-11-20T16:23:27+5:30
रानडुकराला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.
नुआपाडा : ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चक्क एका बिबट्याची शिकार करुन नंतर शिजवून खाल्ला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, बिबट्याचे शीर अन् शेपटी जप्त करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नुआपाडा जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. देवधरा गावाजवळील जंगलात रानडुकरांची शिकार करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. पुस्तम चिंदा (58) आणि हृषिकेश चिंदा (40) यांनी बिबट्याला ठार मारले, त्याची कातडी कापली आणि मांस शिजवून खाल्ले.
वनविभागाच्या माहितीनुसार, ही घटना 16 नोव्हेंबर रोजी घडली. एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, वन अधिकाऱ्यांनी आरोपींच्या अड्ड्यावर छापा टाकला, ज्यामध्ये बिबट्याचे कातडे, डोके आणि शिजवलेले मांस जप्त करण्यात आले. मात्र, त्याचे दोन साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
खारीर वनविभागाचे सहायक वनसंरक्षक मोहम्मद मुस्तफा सालेहा यांनी सांगितले की, तपास सुरू असून अटक आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल. विशेष पथके फरार आरोपींच्या शोधात व्यस्त आहेत. वनविभागाने स्थानिक समुदायांनी वन्यजीव संवर्धनात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे आणि अशा घटनांची त्वरित माहिती अधिकाऱ्यांना द्यावी. बिबट्यासारख्या लुप्तप्राय प्रजातींच्या शिकारीमुळे प्रजातींची ओळखच नष्ट होत नाही तर पर्यावरण संतुलनावरही परिणाम होतो. या घटनेची गांभीर्याने दखल घेत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.