हृदयद्रावक! अभ्यास कर म्हणून आई रोज ओरडायची; मग 5 वीतील मुलाने केलं धक्कादायक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:48 PM2023-01-23T12:48:46+5:302023-01-23T12:49:26+5:30
उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
गाझीपूर : उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील लष्करी जवान सुरेंद्र सिंग यांची पत्नी सरिता सिंग यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खुलासा केला आहे. जवानाच्या पत्नीच्या हत्येची घटना त्यांच्या अल्पवयीन मुलानेच घडवून आणल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले. खरं तर हा मुलगा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी आहे. होमवर्क न केल्यामुळे आई ओरडली होती शिवाय तिने मारहाण केल्याचे मुलाने पोलिसांना सांगितले. याच कारणावरून त्याने आईची हत्या केली. हत्या करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला 19 जानेवारी रोजी पोलिसांनी पकडून बाल न्यायालयात हजर केले.
माहितीनुसार, शहरातील कोतवाली परिसरातील फुलनपूर येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय सरिता सिंग यांची गुरुवारी 19 जानेवारी रोजी दुपारी हत्या करण्यात आली. या प्रकरणाची माहिती परिसरात कळताच पोलिसांना तात्काळ याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या स्टेशन प्रभारींनी मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
दररोज अभ्यास कर म्हणून आई ओरडायची
पोलिसांच्या तपासात महिलेच्या हत्येचा आरोपी त्यांचाच 14 वर्षांचा मुलगा आदित्य सिंग असल्याचे निष्पन्न झाले. मारेकरी आदित्यने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, आई सरिता सिंगच्या सततच्या मारहाणीमुळे तो त्रासला होता. आई सतत ओरडत असल्यामुळे त्याने तिची हत्या केल्याची कबुली आरोपी मुलाने दिली.
आरोपीने पोलिसांना असेही सांगितले की, त्याला आईला मारायचे नव्हते, परंतु रागाच्या भरात झालेल्या हल्ल्यानंतर आईचा मृत्यू झाला. या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक ओमवीर सिंग यांनी सांगितले की, आरोपी मुलाला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"