आधारकार्डची झेरॉक्स न देण्याचा सल्ला मागे; खात्री करूनच शेअर करण्याचा UIDAIचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 07:40 AM2022-05-30T07:40:06+5:302022-05-30T07:40:12+5:30
चुकीचा अर्थ लावला जाण्याची भीती लक्षात घेऊन हा निर्णय तत्काळ मागे घेण्यात आला असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
नवी दिल्ली : सर्वसामान्यांनी त्यांच्या आधारची झेरॉक्स (छायांकित पत्र) कोणासोबतही शेअर करू नका, असा दिलेला सल्ला सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय)ने तत्काळ मागे घेतला आहे. यावरून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. त्यामुळे आधारची झेरॉक्स कुणालाही शेअर करू नका, असा सल्ला देणारे निवेदन मागे घेण्यात आले आहे. नागरिकांनी त्यांच्या आधारची प्रत कोणत्याही संस्थेसोबत शेअर करू नये, त्याचा गैरवापर होऊ शकतो, असे मंत्रालयाने म्हटले होते. यात आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक असणारे आधारकार्ड (मास्क्ड कार्ड) वापरले जाऊ शकते. यामध्ये आधार क्रमांकाचे पहिले आठ अंक लपवून ठेवले जातात, तर केवळ शेवटचे चार अंकच दिसतात. परंतु याचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची भीती लक्षात घेऊन हा निर्णय तत्काळ मागे घेण्यात आला असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
बंगळुरूमधील यूआयडीएआयच्या प्रादेशिक कार्यालयाने जारी केलेल्या प्रकाशनात, सामान्य जनतेला त्यांच्या आधारच्या फोटोकॉपी कोणत्याही संस्थेसोबत शेअर करू नयेत असे सांगण्यात आले होते. यामध्ये पर्याय म्हणून आधार क्रमांकाच्या शेवटच्या चार अंकांचे आधार वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता. यूआयडीएआयकडून आधार कार्डधारकांना त्यांचा आधार क्रमांक वापरण्यात आणि इतरांना शेअर करताना योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. आधार ओळख पडताळणीच्या प्रणालीने आधारधारकाची ओळख आणि गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी व्यवस्था केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.