भारताविरोधातील पाऊल खपवून घेणार नाही;संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:04 PM2023-05-12T12:04:27+5:302023-05-12T12:04:50+5:30
भारताच्या अणुचाचण्यांनी जगाला संदेश दिला की आपण शांतताप्रिय राष्ट्र असलो तरी नालंदा पुन्हा जळताना दिसणार नाही.
नवी दिल्ली : १९९८ मध्ये देशाच्या अणुचाचण्यांनी जगाला संदेश दिला की, भारत हा शांतताप्रिय देश असला तरी स्वाभिमानाविरुद्ध उचलण्यात आलेले कोणतेही पाऊल तो खपवून घेणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी येथे सांगितले.
येथे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित सोहळ्याला संबोधित करताना सिंह म्हणाले की, बाह्य आक्रमणकर्त्यांनी नालंदा येथील शैक्षणिक केंद्र व सोमनाथ येथील सांस्कृतिक प्रतीकाचा विध्वंस केल्यानंतर भारताने इतिहासापासून धडा घेतला. १९९८ च्या पोखरण-२ अणुचाचणीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.
शांत असलो तरीही...
भारताच्या अणुचाचण्यांनी जगाला संदेश दिला की आपण शांतताप्रिय राष्ट्र असलो तरी नालंदा पुन्हा जळताना दिसणार नाही. सोमनाथसारख्या सांस्कृतिक प्रतीकाचा विध्वंस आम्ही सहन करणार नाही. आम्ही आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात उचललेल्या प्रत्येक पावलाला चोख प्रत्युत्तर देऊ,’ असेही सिंह म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी पोखरण येथील अणुचाचणी भारताच्या इतिहासातील सर्वात अभिमानास्पद क्षण असल्याचे म्हटले. तंत्रज्ञान वर्चस्व गाजवण्याचे नव्हे तर प्रगतीला वेग देण्याचे साधन असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह.
मोदींनी केली तुलना
१० वर्षांपूर्वी प्रत्येकवर्षी सुमारे ४००० पेटंट नोंदणीकृत होते, परंतु आता ही संख्या ३०,००० पेक्षा जास्त आहे.
२०१४ मध्ये देशात सुमारे १०० स्टार्टअप होते, आज त्यांची संख्या एक लाखाच्या जवळपास पोहोचली आहे.
पूर्वी वार्षिक ७०,००० ट्रेडमार्क नोंदणीकृत होते, आता हा आकडा २.५ लाखांहून अधिक आहे.
इन्क्युबेशन केंद्रांची संख्या २०१४ मधील १५० वरून ६५० पर्यंत वाढली आहे.