गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:05 PM2024-11-19T12:05:06+5:302024-11-19T12:08:56+5:30
या प्रकरणी पोलिसांनी त्या महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर नोंदविला आहे. ही माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
पाटण : गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयात काही जणांनी एका विद्यार्थ्यावर रॅगिंग केले होते. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्या महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर नोंदविला आहे. ही माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
या महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्यापेक्षा कनिष्ठ विद्यार्थ्यांना शनिवारी रात्री हॉस्टेलच्या रूममध्ये सुमारे साडेतीन तास उभे राहण्याची सक्ती केली होती.
अनिल होता पहिल्या वर्षात
अनिल मेथानिया (१८) याची साडेतीन तास उभे राहिल्यानंतर प्रकृती बिघडली. तो शनिवारी मध्यरात्री बेशुद्ध पडला. रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. धारपूर येथील जीएमईआरएस वैद्यकीय महाविद्यालयात ही घटना घडली. अनिल हा एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होता. १५ विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये राहण्यास मनाई करण्यात आली आहे.
२६ विद्यार्थ्यांचे घेतले जबाब
रँगिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाने डॉ. शाह यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीने रॅगिंग प्रकरणी २६ विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविले. त्यातील ११ हे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात व १५ जण एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे आहेत.