"आई-बाबा मजूर आहेत, पास करा नाही तर लग्न लावतील", विद्यार्थिनीची भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 07:50 PM2024-03-10T19:50:18+5:302024-03-10T19:55:51+5:30
परीक्षेच्या काळात काही नाट्यमय घडामोडी समोर येत आहेत.
राज्यात दहावीची बोर्ड परीक्षा सुरू आहे. परीक्षेच्या काळात काही नाट्यमय घडामोडी समोर येत आहेत. उघडपणे काही ठिकाणी कॉपी पुरवल्याचे निदर्शनास आले. अशातच आता बिहारमधील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. इथे विद्यार्थिनीने उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून एक भावनिक नोट लिहिली आहे. परीक्षेत विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या भन्नाट उत्तरांचे फोटो अनेकदा व्हायरल होत असतात. आता सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका विद्यार्थिनीने भन्नाट अन् भावनिक चारोळ्या लिहून शिक्षकांनाही संभ्रमात टाकले आहे.
संबंधित विद्यार्थिनीने आग्रह करताना लिहिले की, सर प्लीज मला पास करा, नाही तर माझे पप्पा लग्न लावून देतील. खरं तर ही घटना बिहारमधील आग्रा येथील आरा मॉडल शाळेतील आहे. पेपर झाल्यानंतर आता शिक्षकांकडून त्यांची तपासणी सुरू आहे. अशातच एक भन्नाट उत्तर शिक्षकांच्या निदर्शनास आले, ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
विद्यार्थिनीची भावनिक साद!
एका विद्यार्थिनीने लिहिले की, माझी आई मजूर म्हणून काम करते. आम्ही खूप गरीब आहोत. माझे वडील शेतकरी आहेत. शिक्षणाचा भार ते उचलू शकत नाहीत. म्हणूनच ते मला शिकवू इच्छित नाहीत आणि त्यांनी म्हटले आहे की, जर ३१८ गुण मिळाले नाही तर ते अभ्यास करू देणार नाहीत आणि माझे लग्न लावतील. म्हणून प्लीज माझी इज्जत वाचवा. मी गरीब कुटुंबातील मुलगी आहे. माझे वडील शेतकरी आहेत, त्यांना ४०० रुपयेही मिळत नाहीत आणि ते मला कसे शिकवणार? ही मोठी समस्या आहे आणि दुसरे काही नाही.
विद्यार्थी या प्रकारच्या नोट्स उत्तरपत्रिकेत लिहित आहेत. बिहारच्या शिक्षण मंडळाने जिल्ह्यात कॉपी तपासण्यासाठी सहा केंद्रे तयार केली आहेत. पण पेपरच्या तपासणीदरम्यान, शिक्षकांना उत्तरात कविता, शायरी, प्रार्थना आणि नोट्स सापडत आहेत. शिक्षकांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गणिताच्या पेपरात काही भावनिक उत्तरे लिहिली आहेत.