निलंबित पोलिस अधिकाऱ्याने ने जावयाची केली हत्या, कोर्टाच्या आवारातच झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 06:03 PM2024-08-03T18:03:57+5:302024-08-03T18:04:22+5:30
Crime News: चंडीगड येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात आज घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पंजाब पोलीस दलातील निलंबित एआयजी मलविंदर एस. सिद्धू यांनी जमिनीच्या वादामधून त्यांच्या जावयाची गोळ्या झाडून हत्या केली.
चंडीगड येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात आज घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पंजाब पोलीस दलातील निलंबित एआयजी मलविंदर एस. सिद्धू यांनी जमिनीच्या वादामधून त्यांच्या जावयाची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत तरुण हा आयआरएस अधिकारी होता. त्याच्यात आणि आरोपी सासऱ्यांमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. तसेच त्याची सुनावणी कोर्टामध्ये सुरू होती. या सुनावणीसाठीच सासरे आणि जावई कोर्टामध्ये आले होते. त्यामधून या गोळीबाराची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना चंडीगडच्या एसएसपी कंवरदीप कौर यांनी सांगितलं की, आम्हाला आज दुपारी दोन वाजता जिल्हा कोर्टातील मीडिएशन सेंटरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. गोळीबारात जखमी झालेल्या हरप्रीत सिंह याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मलविंदर एस. सिद्धू याला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच त्याच्याकडील हत्यारही जप्त करण्यात आलं आहे.
दरम्यान, एसएसपी कंवरदीप यांनी सांगितले की, आरोपी मलविंदर सिंग हा पंजाब पोलीस खात्यामध्ये एआयजी होता. एफएसएल पथकाला बोलावून घटनास्थळाची तपासणी केली जात आहे. तसेच आम्ही प्रत्यक्षदर्शींसोबत बोलून माहिती घेत आहोत. आरोपी कुठल्या गेटमधून कोर्टाच्या आवारात आला याचीही माहिती घेत आहोत. आरोपीकडून .३२ बोअरची एक पिस्तूल जप्त केली आहे. तसेच आम्ही पिस्तुलामधूल चालवलेल्या ४ आणि न चालवलेल्या ३ गोळ्या जप्त केल्या आहेत. दोन्ही कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती समोर येत आहे.