पावसाचा आता माेठा ब्रेक; यंदा सरासरी गाठण्याची शक्यता कमी; हवामान खात्याने वर्तविला अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 06:24 AM2023-08-28T06:24:31+5:302023-08-28T07:18:29+5:30
यंदा १९७० नंतर प्रथमच दिल्ली, आग्रा आणि वृंदावनमध्ये पूरसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली.
नवी दिल्ली : पावसाने दगा दिल्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. देशभरात ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३२ टक्के कमी पाऊस पडला आहे. पुढील चार दिवस २५ राज्यांमध्ये पावसाची शक्यता नाही. उत्तराखंड, हिमाचलसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता पावसाने बऱ्यापैकी ब्रेक घेतला आहे. इतर राज्यांत पावसाने आधीपासूनच ओढ दिली आहे. याचे कारण म्हणजे अल-निनो. ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
यंदा १९७० नंतर प्रथमच दिल्ली, आग्रा आणि वृंदावनमध्ये पूरसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली. दुसरीकडे, हरयाणामध्ये पहिल्यांदाच पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वांत कोरडा मान्सून ठरला आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत ७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तर ऑगस्टमध्ये आतापर्यंतचा पाऊस ३२ टक्के कमी आहे.
सरासरी गाठण्याची शक्यता कमी
- याचा अर्थ असा की, या पावसाळ्याचा हंगाम (३० सप्टेंबरपर्यंत) सरासरीपेक्षा कमी पावसाने संपेल. सरासरी ९४ ते १०६ टक्के पर्जन्यमान सरासरीएवढे मानले जाते.
- हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्ये भारतातील ३६ पैकी ३२ हंगामी उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९४ टक्के किंवा त्याहून अधिक आहे. सप्टेंबरमध्ये तो सरासरीपेक्षा २० मिमी कमी असेल.
या प्रदेशांनाही फटका
उत्तर प्रदेशच्या मैदानी भागात सामान्यपेक्षा १३ टक्के कमी पाऊस झाला आहे. बिहारमध्ये २५ टक्के कमी, मध्य प्रदेशात १० टक्के कमी पाऊस झाला. याशिवाय केरळ, झारखंड, कर्नाटक आणि छत्तीसगडमध्येही कमी पाऊस झाला आहे.