धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याचे प्रतीक, आंदाेलनाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 11:53 AM2024-01-14T11:53:47+5:302024-01-14T11:54:14+5:30
‘श्री राम मंदिर : एका दिव्य स्वप्नाची पूर्तता’ असा एक लेख लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, बेगडी धर्मनिरपेक्षता व खरी धर्मनिरपेक्षता यांच्यामध्ये असलेल्या फरकाबाबत राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात चर्चा सुरू झाली.
नवी दिल्ली : अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणे, हा मुख्य उद्देश असलेले रामजन्मभूमी आंदोलन त्यानंतर बेगडी धर्मनिरपेक्षतेच्या घातक आक्रमणाचा सामना करत धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक बनले, असे माजी उपपंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले आहे.
‘श्री राम मंदिर : एका दिव्य स्वप्नाची पूर्तता’ असा एक लेख लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, बेगडी धर्मनिरपेक्षता व खरी धर्मनिरपेक्षता यांच्यामध्ये असलेल्या फरकाबाबत राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात चर्चा सुरू झाली.
या आंदोलनाला समाजाच्या तळागाळातून मोठा पाठिंबा मिळत होता. दुसऱ्या बाजूला विशिष्ट समुदायाची मते आपल्याला मिळणार नाहीत, या भीतीमुळे बहुतांश राजकीय पक्ष राम जन्मभूमी आंदोलनाचे समर्थन करण्यास कचरत होते. मतपेढीच्या राजकारणाला शरण जाऊन या पक्षांनी वर्तनाचे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली समर्थन सुरू केले.
१९९०मध्ये सोमनाथ ते अयोध्येपर्यंत लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली राम रथयात्रा काढण्यात आली होती. रथयात्रा काढून आंदाेलनाला राजकीय मुद्दा बनविले. या आंदाेलनमुळे भाजपची ताकत वाढली. अडवाणी हे सक्रिय राजकारणापासून लांब आहेत. त्यावेळी सर्व घटनांचा संदर्भ देऊन लालकृष्ण अडवाणी (वय ९६) यांनी सांगितले की, रथयात्रेच्या रुपाने नियतीनेच कर्तव्य पार पाडण्याची मला संधी दिली हाेती.
अटलजी, पत्नी कमला यांची आठवण
लालकृष्ण अडवाणी म्हणाले की, अयोध्येत राम जन्मभूमीवर राममंदिर बांधण्याचे स्वप्न साकार झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, विश्व हिंदू परिषद, रा. स्व. संघ, भाजप तसेच रामरथयात्रेत सहभागी झालेले हजारो लोक, संतमहंत, कारसेवक, नेते यांचा मी आभारी आहे.
मात्र, अयोध्येत राममंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मला पत्नी कमला व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण येते.
ते आज हे पाहण्यासाठी हवे होते.