भारताच्या डिजिटायझेशनचे सत्या नडेला यांच्याकडून काैतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 09:33 AM2023-01-06T09:33:15+5:302023-01-06T09:33:58+5:30
‘डिजिटल इकोसिस्टीम’ अधिक उत्तम बनविण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची नडेला यांनी प्रशंसा केली.
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कॉर्पचे चेअरमन व सीईओ सत्या नडेला यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांनी डिजिटायजेशन संचालित अर्थव्यवस्थेच्या वृद्धीबाबत चर्चा केली. ‘डिजिटल इकोसिस्टीम’ अधिक उत्तम बनविण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची नडेला यांनी प्रशंसा केली.
नडेला यांनी बैठकीनंतर ट्वीट करून याची माहिती दिली. त्यानंतर नडेला यांनी माध्यमांना सांगितले की, भारत ‘डिजिटल पब्लिक गुड’मध्ये नेतृत्वस्थानी आहे, हे खूपच चांगले आहे. भविष्यात चॅटजीपीटी आणि डॉल-ई यांसारखे मोठे लँग्वेज मॉडेल-आधारित एआय तंत्रज्ञान अधिक महत्त्वपूर्ण होतील.
‘हैदराबादी नडेला’ नडले !
सत्या नडेला यांचे फ्यूचर रेडी टेक्नॉलॉजी समिटमध्ये चॅटजीपीटी या सॉफ्टवेअरशी संभाषणादरम्यान मतभेद झाले आणि सॉफ्टवेअरने त्यांची माफी मागितली, विशेष म्हणजे हे सर्व झाले ते बिर्याणीवरून. नडेला यांनी चॅटजीपीटीला सर्वांत लोकप्रिय दक्षिण भारतीय टिफिन आयटमबद्दल विचारले, त्यावर सॉफ्टवेअरने इडली, डोसा आणि वडा हे उत्तर दिले. पण, पर्यायांमध्ये बिर्याणीचाही समावेश केला. हे काही नडेला यांना आवडले नाही आणि “एक हैदराबादी म्हणून, सॉफ्टवेअर बिर्याणीला दक्षिण भारतीय ‘टिफिन’ म्हणत माझ्या बुद्धिमत्तेचा अपमान करू शकत नाही”, असे ते म्हणाले. सॉफ्टवेअरने लगेच ‘आय एम सॉरी’ म्हटले.