मोहरीच्या तेलाने भरलेला टँकर पलटला; लुटण्यासाठी स्थानिकांची उडाली झुंबड...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:18 IST2025-04-07T18:18:08+5:302025-04-07T18:18:30+5:30
लोक आपापल्या घरातून वादल्या, डब्बे घेऊन आले.

मोहरीच्या तेलाने भरलेला टँकर पलटला; लुटण्यासाठी स्थानिकांची उडाली झुंबड...
UP News : भारतात अनेकांच्या घरी अन्नात मोहरीचे तेल वापरले जाते. सध्या मोहरीचे तेल 150 ते 200 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. अशा परिस्थितीत एखाद्या ठिकाणी फुकट तेल मिळत असेल तर, लोकांची झुंबड उडणे स्वाभाविक आहे. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात पाहायला मिळाला. वाराणसी गोरखपूर महामार्गावर मोहरीच्या तेलाने भरलेला टँकर उलटला अन् लोकांची तेल लुटण्यासाठी झुंबड उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 2 वाजता गाझीपूरमधील वाराणसीहून गोरखपूरला जाणाऱ्या महामार्गावर मोहरीच्या तेलाने भरलेला टँकर पलटला. टँकर पलटी होताच त्याचे झाकण उघडले अन् सर्व तेल रस्त्याच्या कडेला असलेल्या एका तलावात पडले. ही बाब कळताच स्थानिकांची या तलावाकडे झुंबड उडाली. तेल गोळा करण्यासाठी प्रत्येकजण मिळेल त्या बादल्या, डब्बे घेऊन आला.
गावातील लहानांपासून ते मोठ्यापर्यंत...सर्वांनी आपापल्या परीने हे तेल गोळा केले. बऱ्याच वेळानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली, त्यानंतर उपनिरीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले. उलटलेल्या तेलाच्या टँकरमध्ये एकूण 6 चेंबर होते, ज्यामध्ये तेल भरले होते. याबाबत एका तेल व्यापाऱ्याने सांगितले की, संपूर्ण टँकरमध्ये 18,000 लिटर तेल असावे, जे पूर्णपणे वाहून गेले.