हृदयद्रावक! शिक्षकाने चौथीच्या विद्यार्थ्याला मारहाण करून केली हत्या, मुलाची आईही गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 03:24 PM2022-12-20T15:24:56+5:302022-12-20T15:25:28+5:30
कर्नाटकातील गदग येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
गदग : कर्नाटकातील गदग येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर गदग जिल्ह्यातील हदली गावात कंत्राटी काम करणाऱ्या शिक्षकाने रॉडने चौथीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. लक्षणीय बाब म्हणजे त्याच शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या मुलाच्या आईने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र शिक्षकाने तिलाही जखमी केले. लोखंडी रॉडने विद्यार्थ्याला मारहाण केल्यानंतर शिक्षकाने त्याला खिडकीतून खाली फेकून दिल्याचा आरोप मुलाच्या आईने केला आहे. मुथप्पा हदगली असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. मात्र दुर्दैवाने या मारहाणीत संबंधित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील हदली गावात सोमवारी मुथप्पा या कंत्राटी शिक्षकाने चौथीच्या विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. मुथप्पाने त्याला लोखंडी रॉडने मारहाण करून पहिल्या मजल्यावरून ढकलून दिले. या आरोपी शिक्षकाला रोखण्याच्या प्रयत्नात मृत मुलाची आई देखील जखमी झाली असून ती त्याच शाळेत शिक्षिका आहे. परंतु आरोपी शिक्षक मुथप्पा हा फरार आहे.
मुलाला वाचवताना आई गंभीर जखमी
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना नरगुंड तालुक्यातील हदली या गावातील आहे. इथे मुथप्पा या शिक्षकाने 10 वर्षीय भरतला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आणि मुलाला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकले. याशिवाय आरोपी शिक्षकाने मृत मुलाची आई गीता बाराकेरा यांना देखील गंभीर जखमी केले. गीता याच शाळेत एक कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
आरोपीने आणखी एका शिक्षकाला केली मारहाण
आरोपी शिक्षकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारे अन्य शिक्षक एन पाटील यांनाही मारहाण केली. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला अशी माहिती पोलिसांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"