विश्वचषकादरम्यान भारतात दहशतवादी हल्ला घडवणार; पन्नूची धमकी, नवीन व्हिडिओ केला जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 08:06 AM2023-09-28T08:06:51+5:302023-09-28T08:07:12+5:30
पन्नूने हा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली: खलिस्तानी संघटनेचे शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये उड्डाणपुलाच्या भिंती दिसत असून या भिंतींवर खलिस्तान समर्थक आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. व्हिडिओ जारी करून खलिस्तानी दहशतवाद्याने हा सर्व प्रकार भारतीय संसदेजवळ घडल्याचा दावा केला आहे. दिल्लीतील ISBT परिसराजवळील भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिल्याचा दावा पन्नू याने केला आहे.
पन्नूने हा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. उत्तर दिल्लीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, असे मानले जात आहे की पन्नूने भारतविरोधी घोषणा देत ईशान्य दिल्ली आणि उत्तर दिल्लीला जोडणाऱ्या उड्डाणपुलाची तोडफोड केली होती. अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणी एफआयआर नोंदवत आहोत आणि सखोल तपास करू.
दिल्ली पोलिसांना पन्नूच्या व्हिडिओची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या अनेक पथकांनी संसद भवनाजवळील परिसरात शोध घेतला, मात्र काहीही सापडले नाही. व्हिडिओ तपासल्यानंतर उत्तर दिल्लीतील भिंतींवर खलिस्तान समर्थक घोषणा लिहिल्या गेल्याचे आढळून आले. व्हिडिओमध्ये पन्नू दिल्ली खलिस्तान बनेल असे म्हणताना ऐकू येत आहे. कॅनडातून खलिस्तान समर्थक लोक दिल्लीत पोहोचले आणि संसद त्यांच्या मिशनचा एक भाग असल्याचा दावाही त्याने केला.
दहशतवादी पन्नूने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'शहीद निज्जरच्या हत्येसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत आणि शिख फॉर जस्टिस या हत्येचा बदला घेईल. अहमदाबाद येथे ६ ऑक्टोबर रोजी होणार्या आयसीसी विश्वचषक स्पर्धा आमचे लक्ष्य असेल. तत्पूर्वी, पन्नू यांनी १५ ऑगस्टच्या सुमारास आणि G20 नेत्यांच्या शिखर परिषदेपूर्वी दिल्लीत धमक्याही दिल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने हे दोन्ही प्रकरण उघडकीस आणून आरोपींना अटक केली. भारत आणि कॅनडादरम्यान सुरू असलेल्या तणावादरम्यान दहशतवादी पन्नूचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
पन्नूने कॅनेडियन हिंदूंना धमकावले-
कॅनडा आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान पन्नूने नुकतेच कॅनेडियन हिंदूंना धमकावून भारतात परतण्यास सांगितले होते. 'कॅनडा सोडा, हिंदूंनो, भारतात जा' या व्हायरल व्हिडिओमध्ये पन्नू म्हणाले होते की, इंडो-कॅनेडियन हिंदूंनो, तुम्ही तुमची कॅनडा आणि कॅनडाच्या राज्यघटनेशी असलेली निष्ठा नाकारली आहे, असं पन्नू म्हणाला होता.
पन्नूविरोधात अनेक राज्यांमध्ये १६ गुन्हे दाखल-
शीख फॉर जस्टिसशी असलेल्या संबंधांमुळे पन्नूला बेकायदेशीर क्रियाकलाप कायद्यांतर्गत गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केले होते. एका नवीन गुप्तचर अहवालात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या अजेंड्याबद्दल बोलले आहे. सुरक्षा यंत्रणांनी नुकतेच एक नवे दस्तऐवज तयार केले आहे, ज्यात पन्नूच्या कारवाया आणि धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करण्याच्या त्याच्या योजनांचा उल्लेख आहे. पन्नूविरुद्ध भारतातील विविध राज्यांमध्ये १६ गुन्हे दाखल आहेत, यावरून तिच्या देशविरोधी कारवायांचे गांभीर्य स्पष्ट होते. दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंडसह अनेक ठिकाणी ही प्रकरणे समोर आली आहेत.
कोण आहे खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू?
गुरपतवंत सिंग पन्नू हा खानकोट, पंजाबचे रहिवासी आहेत. १९४७च्या फाळणीदरम्यान त्यांचे कुटुंब पाकिस्तानातून अमृतसरमधील खानकोट गावात स्थलांतरित झाले होते. पन्नू याने पंजाब विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. यानंतर तो परदेशात गेला. तेव्हापासून तो कॅनडा आणि अमेरिकेत राहतो. परदेशात राहून तो खलिस्तानी चळवळ चालवत आहे. यामध्ये त्याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची मदत मिळते. त्यांनी शिख फॉर जस्टिस ऑर्गनायझेशन (SFJ) स्थापन केली आहे. पन्नू सोशल मीडियावर सतत फुटीरतावादी बोलतो आणि भारताविरुद्ध विष ओकत राहतो. २०१९मध्ये भारत सरकारने शिख फॉर जस्टिस या संघटनेवर बंदी घातली होती.