पेपर फोडणाऱ्यांपैकी दोघांची कसून चौकशी; न्यायालयाने दिला ३ दिवसांचा रिमांड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 09:15 AM2024-06-27T09:15:49+5:302024-06-27T09:16:00+5:30
नीट-यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सीबीआयने वेगाने तपास सुरू केला आहे.
एस.पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : नीट-यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सीबीआयने वेगाने तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील तीन आरोपी चिंटूकुमार, मुकेशकुमार यांना बुधवारी न्यायालयाने रिमांड दिला. तसा अर्ज सीबीआयने विशेष न्यायदंडाधिकारी हर्षवर्धनसिंह यांच्यासमोर केला होता. या दोघांची आता कसून चौकशी केली जाणार आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बिहारमध्ये फुटल्या होत्या. त्या प्रकरणाची बिहार पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (ईओयू) तपास करत होती. मात्र, केंद्राने हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत या प्रकरणात २० लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रश्नपत्रिका सोडविणारे, प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणारे व विद्यार्थी यांचा समावेश आहे.
नीटसंदर्भातील प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नितीशकुमार, रॉकी, अखिलेशकुमार, सिकंदर यादवेंदू, बिट्टूकुमार, संजीव, अमित आनंद, आयुष राज यांना आरोपी करण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तींविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजीव मुखिया व रॉकीवगळून बाकी सर्व आरोपींना तुरुंगात धाडण्यात आले आहे. संजीव मुखिया हा प्रश्नपत्रिका फोडण्याच्या कारवायांमागील सूत्रधार आहे. तो मूळचा नालंदा जिल्ह्याचा राहणारा असून, बिहार सरकारचा कर्मचारी आहे. त्याने आतापर्यंत काही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फोडल्या. सध्या तो फरार आहे. (वृत्तसंस्था)
नीट-यूजीच्या परीक्षार्थीच्या पालकांकडून पैसे उकळणाऱ्यास अटक
नीट-यूजीच्या परीक्षेत विद्यार्थ्याला गुणवत्ता यादीत झळकवू अशा भूलथापा देऊन पालकांकडून पैसे उकळल्याच्या आरोपावरून पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका शिक्षणसंस्थेशी संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. नीट-यूजीची प्रश्नपत्रिका फोडण्यात या व्यक्तीचा हात आहे का, याचाही पोलिस तपास करत आहेत.