मंदिरात गेला अन् कान धरून माफी मागून 3 लाख रूपयांची केली चोरी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 12:51 PM2022-10-07T12:51:23+5:302022-10-07T12:52:53+5:30
दिल्लीतील मधु विहार परिसरातील मयुरध्वज अपार्टमेंटमधील मंदिरात चोरीची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली: दिल्लीतील मधु विहार परिसरातील मयुरध्वज अपार्टमेंटमधील मंदिरातचोरीची घटना समोर आली आहे. मध्यरात्री ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरट्याने देवासमोर हात जोडून कान पकडून माफी मागितली. नंतर दानपेटीचे कुलूप तोडून तीन लाख रुपये लंपास केले. सोबतच त्याने पितळी घंटा देखील चोरून नेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याआधारे पोलीस आता चोरट्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मंदिराच्या पाठीमागील लोखंडी गज कापून चोरट्याने आत प्रवेश केल्याचे मयुरध्वज सोसायटीतील लोकांनी सांगितले. 2 तास मंदिर परिसरात थांबून ही घटना घडल्याचा अंदाज लोकांकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या भागात क्वचितच गस्त घालतात. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून या परिसरात रोजच गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत.
भगवान के सामने हाथ जोड़कर कान पकड़े ओर माफी मांगी. फिर दानपात्र का ताला तोड़कर उड़ा दिए तीन लाख रुपए, वायरल वीडियो दिल्ली में मधु विहार इलाके का है. pic.twitter.com/IOZgkhTn3l
— Kumar Abhishek (@active_abhi) October 7, 2022
दरम्यान, चोरीच्या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, गुन्हेगार हात जोडताना दिसत आहे. यादरम्यान तो मंदिरात काही संशयास्पद कृत्य करताना दिसत आहे. पूजास्थळाच्या बाहेर पडदा दिसतो. येथे काही घंटाही लटकलेल्या दिसत आहेत. पडद्याआड गेल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी स्पष्टपणे दिसत नाही. पण चोरट्याने दानपेटीतून 3 लाख रूपयांची रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे.
लोकांनी पोलिसांत केली तक्रार
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, सकाळी लोक मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते तेव्हा ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. देणगी पेटीचे कुलूप तुटल्याचे लोकांनी पाहिले. तसेच पूजेच्या वस्तू इकडे तिकडे पसरलेल्या दिसल्या. घटनेची माहिती मिळताच सोसायटीतील इतर लोकही मंदिरात जमा झाले. त्यांनी फोन करून पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मंदिरात चोरीची घटना घडली असून लवकरच चोरट्याचा शोध लावला जाईल.