शिक्षक म्हणाला, ‘तू माझी गर्लफ्रेंड हो’; गुरुदक्षिणा म्हणून विद्यार्थिनीला मागितली ट्रिप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 05:40 IST2025-02-14T05:35:39+5:302025-02-14T05:40:01+5:30
‘एकलव्याने त्याचे गुरू द्रोणाचार्य यांना गुरूदक्षिणा म्हणून आपला अंगठा दिला होता. गुरूदक्षिणा म्हणून तू माझी गर्लफ्रेंड होऊ शकत नाहीस का? असा प्रश्न शिक्षकाने केला.

शिक्षक म्हणाला, ‘तू माझी गर्लफ्रेंड हो’; गुरुदक्षिणा म्हणून विद्यार्थिनीला मागितली ट्रिप
विभास झा
पाटणा : बिहारमधील पाटणा येथील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने गुरू-शिष्य परंपरा मोडीत काढत बारावीच्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना किशनगंज जिल्ह्यातील कोचधामन ब्लॉकमधील किसान हायस्कूलमध्ये घडली आहे.
शाळेतील शिक्षकाने गुरूदक्षिणेच्या नावाखाली बारावीच्या विद्यार्थिनीला सिलिगुडीला एकत्र फिरायला जाण्याची मागणी केली. आरोपी शिक्षकाचे नाव विकास कुमार आहे. शिक्षक फोनवर अश्लील बोलायचा, असा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. तो शिक्षक फोनवर विद्यार्थिनीला म्हणाला, ‘तू माझी गर्लफ्रेंड हो.’ यासाठी शिक्षकाने एकलव्याचे उदाहरण दिले. ‘एकलव्याने त्याचे गुरू द्रोणाचार्य यांना गुरूदक्षिणा म्हणून आपला अंगठा दिला होता. गुरूदक्षिणा म्हणून तू माझी गर्लफ्रेंड होऊ शकत नाहीस का?’ मॅडम (त्याची बायको) तिच्या माहेरी गेल्या आहेत. तर चल सिलिगुडीला फिरायला जाऊया. आपण तिथे मजा करू.’
विद्यार्थिनीची तक्रार
शिक्षकाची निर्लज्ज मागणी ऐकून विद्यार्थिनीने शिक्षकाचा फोन कॉल रेकॉर्ड केला. तिने शाळेच्या मुख्याध्यापकांकडे याबद्दल तक्रार केली. मुख्याध्यापकांनी आरोपी शिक्षकाकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी (बीईओ) यांना शाळेत जाऊन संपूर्ण प्रकरणाचा अहवाल देण्यास सांगितले आहे.