विमानतळावर 'वॉर रूम' उभारणार; उड्डाणाला होणारा विलंब अन् प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन SOP
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 05:30 PM2024-01-16T17:30:15+5:302024-01-16T17:43:03+5:30
ज्योतिरादित्य शिंदे यांनी धुक्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी आणि उड्डाण सेवा चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी कृती आराखडा सादर केला.
नवी दिल्ली: दाट धुक्यामुळे उड्डाण विलंबाच्या अलीकडील घटना लक्षात घेता, विमान नियामक संस्था DGCA ने सोमवारी सर्व विमान कंपन्यांसाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SOP) जारी केली. दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी धुक्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी आणि उड्डाण सेवा चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी कृती आराखडा सादर केला.
ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, आमच्याकडे सहाही मेट्रो शहरांच्या विमानतळांचे दैनंदिन अहवाल आहेत. यासोबतच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा अहवालही आहे. याशिवाय या एसओपींवर नियमितपणे नजर ठेवली जाईल. ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींबाबत कोणत्याही समस्येला सामोरे जाण्यासाठी या सहा मेट्रो विमानतळांवर विमानतळ आणि एअरलाईन ऑपरेटर्सद्वारे 'वॉर रूम' तयार केल्या जातील. यासोबतच पुरेशा सीआयएसएफ दलाची उपलब्धता नेहमीच सुनिश्चित केली जाईल.
दिल्ली विमानतळावरील कॅट-३ धावपट्टी 29L/11R आजपासून सुरु करण्यात आली आहे. यासोबतच धावपट्टी 10/28 देखील कॅट-३ सुसज्ज करण्यात येणार आहे. हे सहा मेट्रो विमानतळ दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद आहेत, अशी माहिती सिंधिया यांनी दिली. यासोबतच विमानाला उशीर होण्याचे कारणही समोर आणणे गरजेचे आहे. यासाठी DGCA ने CAR जारी केली आहे. प्रवाशांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विमानाच्या उड्डाणाच्या विलंबाची माहितीही दिली जाईल. या नव्या मार्गदर्शक सूचना नेमक्या काय आहेत, पाहा...
- सर्व ६ मेट्रो विमानतळांसाठी दिवसातून तीन वेळा अहवाल मागवण्यात आला आहे.
- SOP आणि CAR चे निरीक्षण केले जाईल आणि नियमितपणे अहवाल दिला जाईल.
- विमानतळांवर 'वॉर रूम' उभारण्यात येणार आहेत.
- ६ मेट्रो विमानतळावरील एअरलाईन ऑपरेटर यांना प्रवाशांच्या गैरसोयीच्या कोणत्याही समस्यांचे त्वरित निराकरण करण्यास सांगितले आहे.
- CISF ची उपलब्धता 24 तास सुनिश्चित केली जाईल.
- RWY 10/28 हे री-कार्पेटिंगनंतर दिल्ली विमानतळावर कॅट-३ म्हणून देखील ऑपरेट केले जाईल.