नौदलाच्या जहाजावर महिला कमांडिंग ऑफिसर, सागरी सीमा सांभाळण्याची मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 08:05 AM2023-12-02T08:05:39+5:302023-12-02T08:05:53+5:30
Indian Navy: भारतीय नौदलाच्या जहाजावर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे, असे नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी शुक्रवारी सांगितले.
नवी दिल्ली - भारतीय नौदलाच्या जहाजावर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे, असे नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी शुक्रवारी सांगितले. नौदलातील महिला कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या व श्रेणी देण्याच्या आपल्या धोरणानुसार निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
नौदल दिनापूर्वी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ॲडमिरल कुमार बोलत होते. या निर्णयामुळे महिला ऑफिसरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. (वृत्तसंस्था)
राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्यास सज्ज
हिंद महासागरात चीनच्या वाढत्या कारवायांवर ते म्हणाले की, भारतीय नौदल या भागातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवते. आमच्या तुकड्या संपूर्ण हिंद महासागर प्रदेशात आणि त्यापलीकडे आमच्या राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्यास सज्ज आहेत. महिला अग्निवीरांच्या एकूण संख्येने एक हजाराचा आकडा पार केला आहे. ही आकडेवारी सेवेत महिलांना सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या आणि श्रेणी देण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचा पुरावा आहे’, असेही नौदल प्रमुख म्हणाले.
त्यांना परत आणण्याचे प्रयत्न
-भारत सरकार कतारमध्ये कैदेत असलेल्या आठ माजी नौसैनिकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे ॲडमिरल कुमार म्हणाले. कतारच्या न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा
सुनावली आहे.
- भारत सरकारने फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले असून, कतारमधील उच्च न्यायालयाने ते स्वीकारले आहे. तुरुंगात असलेल्या या भारतीय नागरिकांच्या विधी पथकाने हे अपील दाखल केले आहे.
- हे आठही भारतीय नागरिक अल दाहरा कंपनीत काम करत होते. त्यांना गेल्या वर्षी कथित हेरगिरीप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. कतारच्या अधिकाऱ्यांनी भारतीयांवरील आरोप उघड केलेले नाहीत.