कुत्र्याची होती ॲलर्जी, घरापासून दूर ठेवण्यास सासूने नकार दिल्याने सुनेने मुलीसह केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 05:38 PM2022-09-16T17:38:58+5:302022-09-16T17:41:39+5:30
कर्नाटकातील बंगळुरू येथील एका महिलेने १३ वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केली आहे.
बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मानवतेला लाजवेल अशा या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारण इथे एका महिलेने १३ वर्षांच्या चिमुकल्या मुलीसह आत्महत्या केली आहे. सासूने कुत्र्याला घरापासून लांब न ठेवल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला गृहिणी असून तिची मुलगी इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती. ही महिला पती आणि सासूसोबत घरात राहत होती. याशिवाय त्यांच्या घरात एक कुत्रा देखील होता आणि हाच कुत्रा आत्महत्येचे प्रमुख कारण ठरला आहे. खरं तर मृत महिलेला श्वसनाचा आजार होता, त्यामुळे डॉक्टरांनी तिला कुत्र्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. तिलाही कुत्र्याभोवती अस्वस्थ वाटायचे. त्यामुळे तिने आधी पतीशी बोलून नंतर सासूला याबाबत सांगितले. मात्र सूनेला त्रास होत असताना देखील सासूने कुत्र्याला घरापासून लांब ठेवण्यास नकार दिला.
चिमुकल्या मुलीसह संपवले जीवन
यावरूनच एके दिवशी घरात मोठा वाद सुरू झाला. संबंधित महिलेने घरातील लोकांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता. परंतु तिचा प्रयत्न निष्फळ ठरला. अखेर तिने तिच्या चिमुकल्या मुलीसह तिचे जीवन संपवले. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या सासरच्या मंडळींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.