तरूणीनं आमिष दाखवलं! कामगारानं 'नग्न' होऊन व्हिडीओ कॉल केला अन् ६ लाख गमावून बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 12:53 PM2023-12-21T12:53:41+5:302023-12-21T12:54:13+5:30
१३ ऑगस्ट रोजी संबंधित कामगाराने पूजा शर्माच्या फेसबुक पेजवर फ्रेंडशिपसाठी रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ही घटना घडली.
सूरत : हे सोशल मीडियाचे जग आहे, इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. सोशल मीडियामुळे बहुतांश गोष्टी सोप्या पद्धतीने उपलब्ध होऊ लागल्या आहेत. इंटरनेटवर सर्च करताच जगभरातील माहिती क्षणात आपल्यापर्यंत पोहचते. मात्र, अनेकदा या तंत्रज्ञानाचा दुरूपयोग होताना दिसतो. याचाच प्रत्यय गुजरातमधीलसूरत येथून आला आहे. येथील एका 'हौशी' कामगाराने तरूणीला नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करून स्वत:ची मोठी फसवणूक करून घेतली. खरं तर येथील ३२ वर्षीय कामगाराला व्हॉट्सॲप कॉल करून आरोपींनी त्याला नग्न होण्यास सांगितले आणि जवळपास सहा लाख रूपये उकळले.
दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी संबंधित कामगाराने पूजा शर्माच्या फेसबुक पेजवर फ्रेंडशिपसाठी रिक्वेस्ट पाठवली होती. फेसबुकवर या दोघांमध्ये बरेच बोलणे झाले आणि मैत्री वाढत गेल्यानंतर एकमेकांचे नंबर घेतले. अशातच एके दिवशी पूजाने कामगाराला नग्न होण्याचे आमिष दाखवून व्हिडीओ कॉल केला. इथेच कामगार जाळ्यात फसला अन् मोठी रक्कम गमावून बसला. तरूणीने ब्लॅकमेल करून अधिक पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पण, आणखी पैसे देऊ शकत नसल्याने संबंधित कामगाराने अखेर सूरत सायबर पोलिसांशी संपर्क साधला.
मैत्री पडली महागात
त्याने तक्रारीत सांगितल्यानुसार, पीडित व्यक्तीला जेव्हा पूजाने बाथरूममध्ये जाऊन न्यूड व्हायला सांगितले तेव्हा तो नग्न अवस्थेत होता. मात्र, तो नग्न झाल्यावर तिने कॉल डिस्कनेक्ट केला. मग काही वेळाने पीडित कामगाराला एका अनोळखी नंबरवरून पूजा शर्मासोबत असताना कॉल आला. तेव्हा आरोपींनी स्वत:ची ओळख 'डीएसपी' सुनील दुबे अशी सांगितली. तसेच त्यांनी कामगाराला यूट्यूबवरील बनावट अधिकारी संजय सिंगानिया यांच्याशी बोलण्यास सांगितले, ज्याने 'तुझी नग्न व्हिडीओ व्हायरल करेन' अशी धमकी देत पैशांची मागणी केली. व्हिडीओ व्हायरल करतील या भीतीने कामगाराने पैसे देण्याचे मान्य केले. त्याने मागण्या मान्य करत ५.६५ लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र, पीडित कामगाराला सातत्याने धमकी येऊ लागल्याने, त्याने अखेर सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधला आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी सर्व अज्ञात आरोपींवर IPC ३८४, १७०, १७१, ५०७, १२० B आणि IT कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.