लव्ह मॅरेज करण्यासाठी तरुण बनला दरोडेखोर, जायचं होतं हनिमूनला, पोहोचला तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 16:14 IST2023-11-07T16:13:21+5:302023-11-07T16:14:01+5:30
Crime News: हरयाणामधील भिवानी येथे सीआयए-२ पोलिसांनी दरोड्याच्या एका धक्कादायक घटनेचा उलगडा केला आहे. यामध्ये लव्ह मॅरेजचा खर्च भागवण्यासाठी एका तरुणाने मित्रांसह दरोडा घातला. दरोडा घातल्यानंतर मिळालेल्या लुटीतून त्याला हनिमूनला जायचं होतं.

लव्ह मॅरेज करण्यासाठी तरुण बनला दरोडेखोर, जायचं होतं हनिमूनला, पोहोचला तुरुंगात
हरयाणामधील भिवानी येथे सीआयए-२ पोलिसांनी दरोड्याच्या एका धक्कादायक घटनेचा उलगडा केला आहे. यामध्ये लव्ह मॅरेजचा खर्च भागवण्यासाठी एका तरुणाने मित्रांसह दरोडा घातला. दरोडा घातल्यानंतर मिळालेल्या लुटीतून त्याला हनिमूनला जायचं होतं. मात्र तो पकडला गेला. आता तो हनिमूनऐवजी तुरुंगात पोहोचला आहे.
भिवानी सीआयए-२ ज्या जाळ्यात सापडलेल्या दरोडेखोरांना पोलीस एसपी वरुण सिंगला यांच्या उपस्थितीमध्ये प्रसारमाध्यमांसमोर हजर करण्यात आलं. आरोपी आणि प्रेमी असलेल्या आनंद याने लव्ह मॅरेज करण्यासाठी सहकाऱ्यांसह २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी भिवानीमधील सिवानी येथे दरोडा टाकला होता. पाच जणांनी धारदार हत्यारांचा धाक दाखवून कॉमन सर्व्हिस सेंटरचे संचालक कुलदीप यांना मारहाण करून त्यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये लुटले. त्यानंतर दरोडेखोर प्रेमवीर असलेल्या आनंद याने शेजारील गावातील एका तरुणीसोबत लव्ह मॅरेज केलं. त्यानंतर लव्ह मॅरेज केल्याने संरक्षण मिळावे म्हणून तो पोलीस ठाण्यात पोहोचला.
भिवानीचे एसपी वरुण सिंगला यांनी सांगितले की, २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सिवानीमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटरचे संचालक असलेल्या कुलदीप यांच्यावर आनंद आणि त्याच्या चार साथीदारांनी धारदार हत्यारांच्या मदतीने हल्ला केला आणि १ लाख ६० हजार रुपये लुटले. या प्रकरणाचा तपास करत सीआयए-२ पोलिसांनी सिवानी येथील आनंद, बडवा गावातील राहुल आणि कुलदीप तर रावतखेडा गावातील पवन उर्फ खबरी यांना अटक केली.