हमारी अधुरी कहानी! प्रेयसीच्या घरासमोरच प्रियकरानं संपवलं जीवन; व्हिडीओमध्ये म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 06:11 PM2023-08-03T18:11:51+5:302023-08-03T18:12:13+5:30
गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची मागणी होत असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अहमदाबाद: प्रेम म्हणजे खेळ भावनांचा... भावना दुखावल्याने कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची मागणी होत असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील भावनगरमधील प्रेमभंग झालेल्या युवकाने जे केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. भावनगर येथील या तरूणाचे एका तरूणीवर प्रेम होते पण प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने व्यथित झालेल्या तरूणाने अखेरचा व्हिडीओ बनवून जीवनयात्रा संपवली.
आत्महत्या करण्यापूर्वी मृत तरूणाने व्हिडीओ करत सर्व लोकांची नावे घेतली आणि नंतर प्रेयसीच्या घराबाहेर विष पिऊन आत्महत्या केली. भावनगरमधून समोर आलेला हा प्रेम कहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची दखल घेत भावनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
अखेरचा व्हिडीओ अन् अखेरचा श्वास
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावनगर जिल्ह्यातील झेलई येथील रहिवासी असलेल्या रोशन तलावियाचे जवळच्या एका गावातील मुलीवर प्रेम होते. रोशन आणि त्याची प्रेयसी यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला अन् ते दोघेही रोशनच्या घरी राहायला आले. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाचे आमिष दाखवून मुलीला माघारी घरी नेले. मात्र, नंतर मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिल्याने रोशनने जीवन संपवले. प्रेयसीच्या घरासमोर विष प्राशन करून रोशनने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणाने व्हिडीओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने दोन -तीन लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोशन तलावियाने आत्महत्यापूर्वी केलेल्या व्हिडीओत सांगितले की, विजयभाई आणि संजय या दोघांमुळे मी आत्महत्या करत आहे. त्या दोघांनी मला फसवले. मला लग्न करू दिले नाही. जेव्हा आम्ही दोघे पळून गेलो तेव्हा त्यांनी सांगितले होते की, तुमचे दहा दिवसांत लग्न होईल, परंतु २ महिने झाले तरी लग्न झाले नाही, म्हणून मी आत्महत्या करत असून त्यांना तुरूंगात पाठवत आहे.