धक्कादायक! प्रेयसी बनून प्रेमाचा 'खेळ', मित्रांनीही केलं ब्लॅकमेल; अन् भावी नवरदेवानं संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 01:46 PM2023-02-05T13:46:56+5:302023-02-05T13:47:22+5:30
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका कुटुंबात मुलाच्या लग्नाची तयारी धुमधडाक्यात सुरू होती. मात्र, हे सर्व स्वप्ने पूर्ण होण्याआधीच सर्व काही क्षणातच संपले. वऱ्हाडी बनण्याची इच्छा जपणाऱ्या या कुटुंबाला साखरपुडा झाल्यानंतर आठवडाभरातच आपल्या मुलाला गमवावे लागले. खरं तर होणाऱ्या नवरदेवाला त्याच्या मित्र-मैत्रिणींनी टोळी बनवून बलात्काराच्या प्रकरणात अडकवून त्याच्याकडून मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला. मृत तरूणाने सुसाईड नोट लिहून ही बाब उघडकीस आणली आहे.
ही घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील मोहनलालगंज येथील आहे. बिजनौरच्या शिव गुलाम खेडा येथील रहिवासी दिलीप कुमार याचा 5 दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. 20 फेब्रुवारी रोजी टिळा लावण्याचा कार्यक्रम आयोजित होता. दरम्यान, दिलीपने कालव्याजवळील आंब्याच्या बागेतील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिथे पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये ब्लॅकमेल आणि खोट्या केसेसच्या गोष्टींचा उल्लेख आहे. नातेवाईकांनी देखील सोनम रावत नावाच्या मुलीवर मुलाचा छळ केल्याचा आरोप केला आहे.
सुसाईड नोट लिहून संपवलं जीवन
झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मृताच्या खिशात सुसाईड नोट सापडली. यामध्ये दिलीपने बनावट प्रेयसी आणि तिचे तीन मित्र आपल्याला बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवण्याची धमकी देत असल्याचे नमूद केले आहे. ब्लॅकमेलच्या या खेळात त्याचे तीन पुरुष मित्रही सामील होते. हे सर्वजण मागील 5 महिन्यांपासून त्याच्याकडून पैसे उकळत होते. या सर्वांनी मिळून एक टोळी तयार केली असून अशाच प्रकारे त्यांनी अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. मी खूप अस्वस्थ आहे आणि मला मरायला भाग पाडले आहे. असा खळबळजनक आरोप मृत दिलीपने सुसाईड नोटच्या माध्यमातून केला आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
लग्नाची तयारी सुरू असल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. दिलीपच्या कुटुंबात वडिलांशिवाय आई, एक भाऊ आणि बहीण आहे. मात्र, दिलीपच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, दिलीपच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसही कारवाई करत आहेत. त्यांनी सोनम, तिच्या मैत्रीणी आणि पुरुष साथीदारांविरुद्ध ब्लॅकमेल आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"