"I Love You आई, मला माफ कर...", सरकारी नोकरी न मिळाल्याने तरूणाने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 01:33 PM2023-02-12T13:33:52+5:302023-02-12T13:34:55+5:30
छत्तीसगडमधील रायपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
रायपूर : छत्तीसगडमधील रायपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे भिलाई या भागातील तरुणाला आयुष्यात काहीच करता न आल्याने एवढा पश्चाताप झाला की त्याने धरणात उडी मारून जीवन संपवले. मृत देवेंद्र राठोड याने आयटीआय (ITI) पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरीसाठी अनेकदा प्रयत्न केले, मात्र यश मिळाले नाही. यामुळे हतबल होऊन त्याने स्वतःचे जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारीला दरी या धरणात उडी मारण्यापूर्वी तरुणाने आईला फोन करून आय लव्ह यू म्हणत आईची माफी मागितली होती आणि नंतर उडी मारून जीवन संपवले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शहरातील लष्कराच्या जवानांनी मृत तरूणाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याचा मृतदेह धरणातील जलकुंभांमध्ये आढळून आला. पोलिसांना मृताकडून पाच पानी सुसाईड नोट मिळाली असून, त्यात त्याने स्वत:लाच आपल्या मृत्यूला जबाबदार मानले असून कोणालाही त्रास देऊ नये, अशी विनंती केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
मृताचे वडील सीएसईबीचे कर्मचारी असून सेवानिवृत्तीनंतर ते संपूर्ण कुटुंबासह नाकतीखार येथे राहत होते. सुसाईड नोटनुसार, याआधीही मृत तरूणाच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता, मात्र त्यावेळी त्याने स्वत:ला सांभाळले होते. मात्र यावेळी त्याने हिंमत गमावून आपल्या मृत्यूची कहाणी स्वत:च्या हाताने लिहिली. देवेंद्र या तरूणाच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला असून रडून-रडून त्यांची अवस्था वाईट झाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"