आधार कार्ड अनेक वेळा बदलता येणार नाही, आधारमधील कोणते तपशील किती वेळा तुम्ही अपडेट करू शकता? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 10:08 AM2022-08-30T10:08:27+5:302022-08-30T10:08:44+5:30
Aadhaar card:
लोकमत न्यूज नेटवर्क : जर तुम्ही असा विचार करत असाल की तुम्ही आधार कार्डमध्ये तुमचे नाव आणि जन्मतारीख पुन्हा पुन्हा बदलू शकता,
तर ते चुकीचे आहे. आधारमधील कोणते तपशील किती वेळा तुम्ही अपडेट करू शकता ते पाहू...
नाव फक्त दोनदा अपडेट करता येते
तुम्ही आधारमध्ये तुमचे नाव फक्त दोनदा अपडेट किंवा बदलू शकता. जन्मतारीख तुम्ही केवळ एकदाच बदलू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही पत्त्याबद्दल बोललात, तर तुम्ही तो कितीही वेळा अपडेट करू शकता.
लिंग बदलही करू शकता
जर तुम्हाला लिंग म्हणजेच जेंडरमध्ये काही बदल हवा असेल तर त्यासाठीही एक वेळची सुविधा आहे. तुम्ही ते एकदा बदलू शकता.
कुठे संपर्क कराल?
प्रथम तुम्हाला आधारच्या प्रादेशिक कार्यालयाला भेट किंवा help@uidai.gov.in ला ई-मेल करावा लागेल. मग तुम्हाला बदल का करायचा आहे त्याचे कारण स्पष्ट करावे लागेल. त्यानंतर त्याच्याशी संबंधित तपशील आणि त्याचे पुरावे द्यावे लागतील. तुमच्याकडे योग्य कारण असेल तरच त्याला मान्यता दिली जाईल, अन्यथा तुमची विनंती फेटाळली जाईल.
मर्यादेपेक्षा जास्त बदल करण्यासाठी काय करावे लागेल?
जर तुम्हाला नाव, जन्मतारीख आणि लिंग अनेकवेळा बदलायचे असेल तर ते शक्य आहे; परंतु त्यासाठी अपवादात्मक परिस्थिती असेल तरच हा बदल करण्यात येईल. यासाठी तुम्हाला पुन्हा आधारच्या प्रादेशिक कार्यालयात जावे लागेल.
किती द्यावे लागेल शुल्क?
आधार कार्डमध्ये बदल करताना तुम्हाला थोडे शुल्कही द्यावे लागेल. उदाहरणार्थ, बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला १०० रुपये भरावे लागतील, तर डेमोग्राफिक अपडेटसाठी तुम्हाला ५० रुपये द्यावे लागतील. रंगीत आधार डाऊनलोड करण्यासाठी ३० रुपये शुल्क भरावे लागेल.
मोबाइल नंबर अपडेट करणे आवश्यक
जर योग्य मोबाइल नंबर आधार कार्डमध्ये अपडेट केलेला नसेल, तर प्रथम तुम्हाला तो अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जावे लागेल. जर मोबाइल नंबर अपडेट केला असेल तर तुम्ही ऑनलाइन काही बदल करू शकता.