‘आधार’ने प्राप्तिकर रिटर्न भरले, तरी ‘पॅन’ नंबर स्वत:हून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:35 AM2019-07-08T06:35:34+5:302019-07-08T06:35:47+5:30
सरकार आपणहून करणार व्यवस्था
नवी दिल्ली : ‘पॅन कार्ड’ व ‘आधार कार्ड’ परस्परांना पर्याय म्हणून वापरता येतील, अशी घोषणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना केली असली, तरी प्राप्तिकराचे रिटर्न भरण्यासाठी ‘पॅन कार्ड’ आता इतिहासजमा झाले, असे समजू नका. जे करदाते फक्त ‘आधार’ नंबर देऊन रिटर्न भरतील, त्यांच्यासाठी प्राप्तिकर विभाग स्वत:हून ‘पॅन’ नंबर तयार करून दोन्हींची जोडणी करणार आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदी यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. ते म्हणाले, वित्तमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता ‘पॅन’ नंबर इतिहासजमा होईल, असे म्हणणे चुकीचे ठरेल. ‘पॅन’ व ‘आधार’ची परस्परांशी जोडणी हे कायदेशीर बंधन आहे व त्याचे पालन यापुढेही होतच राहील.
‘पॅन’ व ‘आधार’साठी एकाच प्रकारची माहिती
लागत असल्याने ‘आधार’ नंबर मिळाल्यावर त्या व्यक्तीला ‘पॅन’ नंबरही विनासायास दिला जाऊ शकतो. एखाद्याने ‘पॅन’ घेतले नसले तर त्यास ‘पॅन’ देणे आवश्यक आहे, असे वाटल्यास स्वत:हून ते देण्याचा अधिकार प्राप्तिकर अधिकाऱ्यांना आहे. शिवाय ज्यांच्याकडे १ जुलै २०१७ या तारखेला ‘पॅन’ आहे व जे ‘आधार’ घेण्यास पात्र आहेत अशा प्रत्येकाने ‘आधार’ क्रमांक कर विभागास देणेही बंधनकारक आहे.
आधी होईल जोडणी, मग भरता येईल रिटर्न
मोदी म्हणाले की, ‘पॅन’नंबर नसलेल्यांना प्राप्तिकर रिटर्न भरण्यात अडचण येऊ नये यासाठी दिलेली ही जास्तीची सुविधा आहे. करदात्याने केवळ ‘आधार’ नंबर टाकून रिटर्न भरले तरी करनिर्धारण अधिकारी स्वत:च्या अधिकारात करदात्यासाठी एक स्वतंत्र ‘पॅन’ नंबर देईल. ‘पॅन’व ‘आधार’ची तो स्वत:हून जोडणी करेल व त्यानंतरच रिटर्न भरण्याची पूर्ण होईल.