दिवाळखाेरी मंडळाकडून अनेक कर्मचाऱ्यांचे ‘आधार’, ‘पॅन’ लीक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 10:25 AM2021-06-28T10:25:47+5:302021-06-28T10:25:57+5:30
विविध कंपन्या : चुकीने माहिती अपलाेड झाल्याचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : देशाच्या दिवाळखाेरी मंडळाकडून विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ‘आधार’ आणि ‘पॅन’ क्रमांकाची माहिती लीक झाल्याचे आढळून आले आहे. हा प्रकार चुकीने घडल्याचे स्पष्टीकरण मंडळाने दिले आहे.
दिवाळखाेरी मंडळाकडून एका स्वतंत्र संकेतस्थळाचे काम सुरू आहे. दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व कर्ज पुरवठादारांचे दावे आणि सद्य:स्थितीची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहेत. मात्र, एका चुकीमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे आधार क्रमांक तसेच ‘पॅन’ची यादी संकेतस्थळावर अपलाेड झाली. दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत असलेल्या विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची माहिती या यादीत हाेती. अशा किती कर्मचाऱ्यांची माहिती लीक झाली, याचा नेमका आकडा कळू शकला नाही. कंपन्या दिवाळखाेरीत निघाल्यानंतर त्यांना कर्ज देणाऱ्या लहान संस्थांना दाव्यांबाबत सद्य:स्थितीची माहिती उपलब्ध हाेत नसल्याची तक्रार अनेकांनी केली हाेती. अनेक कंपन्यांची संकेतस्थळे
नाहीत. त्यामुळे दाव्यांचा पाठपुरावा करण्यातही अडचणी येत असल्याचे कर्ज पुरवठादारांचे म्हणणे हाेते. ती माहिती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे.