आधारमुळे वाचले दोन लाख कोटी रुपये; जगातील सर्वाधिक यशस्वी बायोमेट्रिक ओळख यंत्रणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 12:36 PM2022-06-03T12:36:47+5:302022-06-03T12:37:04+5:30
आधारमुळे अडथळ्यांशिवाय तसेच मध्यस्थांशिवाय योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
नवी दिल्ली : आधारमुळे कल्याणकारी योजनांतील बनावट लाभधारक दूर झाल्याने सरकारचे तब्बल दोन लाख कोटी रुपये वाचले आहेत, अशी माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली. आधार जगातील सर्वाधिक यशस्वी बायोमेट्रिक ओळख यंत्रणा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
कांत यांनी सांगितले की, आधारचे यश पाहून त्याचे तंत्रज्ञान जगात अन्यत्र वापरण्यासाठी जागतिक बँक आणि संयुक्त राष्ट्र यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी चर्चा केली आहे. ‘आधारच्या सुलभ वापरासाठी अलीकडील पुढाकार’ या विषयावरील एका कार्यशाळेत अमिताभ कांत यांनी हे वक्तव्य केले.
आधारमुळे अडथळ्यांशिवाय तसेच मध्यस्थांशिवाय योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचत आहेत. आधारचा वापर आता कल्याणकारी योजनांशिवाय इतर अनेक ठिकाणी केला जात आहे. आधारने डिजिटल इंडियासाठी मजबूत, मूलभूत यंत्रणा निर्माण करण्याचे कार्य केले आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधांचे यशस्वीरीत्या व सुलभतेने डिजिटीकरण कसे केले जाऊ शकते, याचे उत्तम उदाहरण आधारने जगापुढे ठेवले आहे.
प्रत्येक कुटुंब जोडले-
आधार यंत्रणेमुळे आता प्रत्येक परिवार औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडला गेला आहे. छोटी कर्जे, विमा आणि निवृत्ती वेतन योजना यांसाठीचा मंच त्यामुळे नागरिकांना उपलब्ध झाला आहे. - अमिताभ कांत, सीईओ, नीती आयोग