१७५ काेटी वेळा झाले ‘आधार’ व्हेरिफिकेशन; ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 08:03 AM2022-12-04T08:03:42+5:302022-12-04T08:03:55+5:30
८,४२६ कोटी ऑक्टोबरअखेरपर्यंत पडताळणी व्यवहार आधारच्या १२ अंकी डिजिटल आयडीचा उपयोग करून केले.
नवी दिल्ली : देशात आधार कार्डच्या वापरात जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये आधार कार्डद्वारे १७५.४४ कोटी पडताळणी व्यवहार (ऑथेन्टिकेशन ट्रॅन्झॅक्शन) झाले. यातील बहुतांश पडताळणी व्यवहार बोटांच्या ठशांद्वारे पूर्ण करण्यात आले आहेत. त्याखालोखाल डेमोग्राफिक व ओटीपी आधारित पडताळणीचा प्रक्रियेचा वापर करण्यात आला. आधार कार्ड भारताच्या ‘डिजिटल इंडिया’ पुढाकारात महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसत आहे.
८,४२६ कोटी ऑक्टोबरअखेरपर्यंत पडताळणी व्यवहार आधारच्या १२ अंकी डिजिटल आयडीचा उपयोग करून केले. यात हयात प्रमाणपत्र, ई-केवायसी, दूरवर्ती क्षेत्रातील बँकिंग व्यवहार आणि आधाराधिष्ठित डीबीटी अथवा पडताळणी यांचा समावेश आहे.
फेस सर्टिफिकेशनमध्ये जबरदस्त वाढ
फेस सर्टिफिकेशनद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या सप्टेंबर २०२२ मध्ये ४.६७ लाख होती. ऑक्टोबरमध्ये हा आकडा तब्बल ३७ लाखांवर गेला. फेस सर्टिफिकेशनद्वारे निवृत्तिवेतनधारकांस सामान्य सेवा केंद्रांवर न जाताच आपल्या मोबाईल फोनचा वापर करून घरूनच डिजिटल हयात प्रमाणपत्र बनविण्याची सुविधा मिळते.
ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही लाभ
आधारचा उपयोग करून २३.५६ कोटी ई-केवाईसी व्यवहार ऑक्टोबरमध्ये झाले. ऑक्टोबर २०२२ पर्यंत ई-केवायसीची एकूण संख्या १,३२१.४९ कोटी झाली आहे. आधारद्वारे होणाऱ्या ई-केवायसीमुळे बँकिंग व बिगर-बँकिंग वित्तीय सेवा अधिक पारदर्शक तसेच अधिक सुलभ झाल्या आहेत. ग्राहक आणि व्यापारी अशा दोघांनाही त्याचा लाभ होत आहे. आधारधारकाच्या संमतीनंतरच ई-केवायसी केले जाते. यात कागदोपत्री कारवाई पूर्णत: समाप्त झाली आहे.
२३.६४ कोटी एईपीएस आधारित व्यवहार
‘आधार सक्षम देय प्रणालीला’ही (एईपीएस) ऑक्टोबरमध्ये गती मिळाली आहे. आधारच्या माध्यमातून दुर्बल घटक श्रेणीतील नागरिक १,१०० पेक्षा अधिक शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत. ऑक्टोबरमध्ये २३.६४ कोटी एईपीएस आधारित व्यवहार झाले. सप्टेंबरच्या तुलनेत हा आकडा १२.४ टक्के अधिक आहे. ऑक्टोबर २०२२ च्या अखेरपर्यंत एईपीएस आणि मायक्रो-एटीएम नेटवर्कच्या माध्यमातून दूरवर्ती भागात १,५७३.४८ कोटी बँकिंग व्यवहार करण्यात आले आहेत.