Aadhaar Update: लिमिटेड टाईमसाठी ऑफर! आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार; एकाचे 50 रुपये वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 08:44 AM2023-03-16T08:44:17+5:302023-03-16T08:46:25+5:30
फुकटात कागदपत्रे अपडेट करण्याची संधी. १० वर्षे झाली असतील तर आधार अपडेट कंपल्सरी केले आहे.
जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर ५० रुपये वाचविण्याची संधी आहे. आधार कार्ड अपडेट काही काळासाठी मोफत करण्यात आली आहे. युआयडीएआयने याची माहिती दिली आहे. ही मोफत सेवा १४ जूनपर्यंत सुरु राहणार आहे. या काळात जर तुमचे १० वर्षे जुने आधार कार्ड असेल तर अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मोफत आधार अपडेटसाठी एक अट ठेवण्यात आली आहे. ती म्हणजे हे मोफत अपडेट केवळ ऑनलाईन पोर्टलवर करता येणार आहे. यासाठी कोणतीही फी द्यावी लागणार नाही. मात्र, जर आधार केंद्रावर गेलात तर तिथे डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी ५० रुपयांची फी द्यावी लागणार आहे. यापूर्वी आधार पोर्टलवर अपडेट करण्यासाठी २५ ते ५० रुपये मोजावे लागत होते.
आधार दस्तऐवज विनाशुल्क ऑनलाइन अपडेट करण्याचा UIDAI चा निर्णय एक लोककेंद्रित पाऊल आहे. याचा लाखो लोकांना फायदा होईल. पुढील तीन महिन्यांसाठी (म्हणजे 15 मार्च ते 14 जून 2023 पर्यंत) मोफत सेवा उपलब्ध आहे, असे युआयडीएआयने म्हटले आहे.
'आधार नोंदणी आणि अद्यतन विनियम, 2016' नुसार, आधार क्रमांक धारक ओळखीचा पुरावा (POI) आणि पत्त्याचा पुरावा (POA) दस्तऐवज सादर करून किमान एकदा ते अद्ययावत किंवा बदलू शकणार आहेत. हे निशुल्क फक्त ऑनलाईनवरच उपलब्ध आहे.