सुशांतशी संबंधित 'ते' बनावट ट्विट महागात पडलं; 'आज तक'ला १ लाखाचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 06:23 AM2020-10-10T06:23:55+5:302020-10-10T09:01:05+5:30
एनबीएसएचा दणका; सुशांतसिंह प्रकरणी चुकीचे वृत्तांकन भोवले
नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याशी संंबंधित बनावट ट्विट प्रसारित केल्याबद्दल ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अॅथॉरिटी (एनबीएसए) या संस्थेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तसेच या प्रकरणाच्या वृत्तांकनात मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल आज तक, झी न्यूज, इंडिया टीव्ही, न्यूज २४ या वाहिन्यांनी जाहीर माफी मागावी, असाही आदेश एनबीएसएचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी दिला आहे.
बनावट ट्विटचे प्रसारण करून त्याचा संबंध सुशांतसिंह राजपूतशी जोडल्याबद्दल ‘आज तक’ने वृत्तवाहिनीवरून जाहीर माफी मागावी, असेही या आदेशात म्हटले आहे. याप्रकरणी सौरव दास यांनी तक्रार केली होती. एनबीएसएच्या आदेशाची माहिती दास यांनी ट्विटरवरून दिली आहे.
सत्यता न तपासताच व्हिडीओ केले प्रसिद्ध
एनबीएसएने म्हटले आहे की, कोणतीही गोष्ट प्रसारित करण्यापूर्वी त्याची खातरजमा करून घेणे आवश्यक असते. मात्र, सुशांतसिंह राजपूतशी संबंध जोडून काही ट्विट दाखविताना आज तकने त्याची सत्यता तपासली नाही. या कार्यक्रमाचे यू-ट्युब तसेच ‘आज तक’च्या वेबसाइटवर असलेले व्हिडीओ तत्काळ काढून टाकावेत.
‘न्यूज नेशन’ला समज
‘न्यूज नेशन’ या वृत्तवाहिनीला सुशांतच्या मृतदेहाची दृश्ये दाखविल्याबद्दल एनबीएसएने समज दिली. या प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही, असे न्यूज नेशनने कळविताच एनबीएसएने वाहिनीवर कारवाई केली नाही. सुशांतसिंहच्या मृतदेहाची क्लोजअप छायाचित्रे एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दाखविली नव्हती, याची दखल घेऊन एनबीएसएने या वृत्तवाहिनीवरही कारवाईचा बडगा उगारला नाही.
जाहीर माफी मागा
‘आज तक’ने जाहीर माफी कधी प्रसारित करावी, त्याचा मजकूर, तारीख, वेळ हे एनबीएसएकडून कळविले जाणार आहे. ही जाहीर माफी प्रसारित केली की नाही, याचा पुरावा असलेली सीडी प्रसारणानंतर सात दिवसांच्या आत ‘आज तक’ला एनबीएसएला सादर करावयाची आहे.
‘रिपब्लिक’च्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्याला समन्स
मुंबई : टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट) रॅकेटप्रकरणी रडारवर असलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चौकशीला मुंबई पोलिसांनी सुरुवात केली आहे. शुक्रवारी रिपब्लिकचे मुख्य वित्तीय अधिकारी शिवा सुब्रह्मण्यम सुंदरम यांना शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले आहे.