महाराष्ट्रातही ‘आप’ला फुटीची बाधा?
By Admin | Published: March 30, 2015 11:16 PM2015-03-30T23:16:45+5:302015-03-30T23:16:45+5:30
पक्षातील अंतर्गत कलह, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे नेते, यातून समोर येत असलेले एकापाठोपाठ एक असे स्टिंग
नवी दिल्ली : पक्षातील अंतर्गत कलह, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे नेते, यातून समोर येत असलेले एकापाठोपाठ एक असे स्टिंग आणि आरोप-प्रत्यारोप, यामुळे महाराष्ट्रातील आम आदमी पार्टीचे (आप) अनेक नेते अतिशय निराश आहेत. पक्षाला ‘रामराम’ ठोकण्याचा विचार या नेत्यांनी चालवला आहे.
अंजली दमानिया यांनी पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे दिले आहेत. काल रविवारी नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता महाराष्ट्रातील ‘आप’चे नेते मारुती भापकर यांनी पक्षातील या यादवीला कंटाळून राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जे झाले ते लोकशाहीच्या हत्येपेक्षा कमी नव्हते. मी दु:खी आहे व पक्ष सोडण्यावर गंभीरपणे विचार करत आहे. उद्या होऊ घातलेल्या राज्य समितीच्या बैठकीत याबाबत मी निर्णय घेईन, असे भापकर यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात अण्णा आंदोलनाचे नेतृत्व केलेल्या मयंक गांधी यांनी केजरीवालांच्या ‘हुकूमशाही’विरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला आहे. तूर्तास त्यांनी या मुद्यावर बोलायचे टाळले. मात्र त्यांच्या एका निकटच्या सूत्रांच्या मते, विद्यमान स्थितीत ‘आप’ मध्ये काम करणे मयंक यांच्यासाठी कठीण झाले आहे. अन्य एका नेत्याच्या मते, अंजली दमानिया यांनी कधीच पक्ष सोडला आहे. विजय पांढरे, सुभाष वारे आणि राज्यातील अन्य काही बडे नेते पक्षातील कुरबुरींमुळे निराश आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)