अरविंद केजरीवालांची तिरकी चाल! आम आदमी पक्ष बिहार विधानसभा लढणार; INDIA आघाडीत बिघाडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 09:47 AM2023-08-28T09:47:31+5:302023-08-28T09:51:33+5:30
बिहारमधील गलिच्छ राजकारणामुळे राज्य मागे पडले, अशी टीका आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे.
INDIA VS NDA: इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. २६ विरोधी पक्ष मुंबईतील बैठकीत सहभागी होणार आहेत. भाजपला चितपट करण्यासाठी विरोधक रणनीति आखत असतानाच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, यामुळे आता इंडिया आघाडीत बिघाडी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी एनडीए आणि विरोधकांची इंडिया आघाडी जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी एकवटलेल्या इंडिया आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. आम आदमी पक्षाने बिहार विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीत कितपद ऐकी राहील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका लढण्याची घोषणा
आम आदमी पक्षाने बिहारमध्ये विधानसभा निवडणुका लढण्याची घोषणा केली. बिहारमध्ये २०२५ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आपचे प्रमुख सचिव संदीप पाठक यांनी बिहारमधील नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक घेतली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीवेळी, संदीप पाठक यांनी बिहारमध्ये 'आप'ला मजबूत करण्यावर भर दिला. आपचे बिहारमधील प्रमुख अजिश यादव हेही उपस्थित होते.
गलिच्छ राजकारणामुळे राज्य मागे पडले
बिहारमधील गलिच्छ राजकारणामुळे राज्य मागे पडले आहे, अशी टीका करताना, बिहारमध्ये आम्ही विधानसभा लढणार आहोत. पण, निवडणुका लढण्याआधी संघटना मजबूत असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. गुजरातमध्ये लढल्याप्रमाणे बिहारमध्येही पूर्ण शक्तीने आम्ही निवडणूक लढवू. त्याआधी पक्ष स्थानिक निवडणुका लढवेल, अशी माहिती पाठक यांनी दिली.