'भाजपाचा गड भेदण्यात यश, पुढील निवडणुकीत...'; अरविंद केजरीवालंचा दावा, नागरिकांचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 05:35 PM2022-12-08T17:35:32+5:302022-12-08T17:35:51+5:30
हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला चांगली कामगिरी करता आली नसली, तरीही त्यांच्या पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.
नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने राजधानी दिल्लीतील महापालिका निवडणुकीत मोठ्या विजय मिळविल्यानंतर, आता दुसऱ्याच दिवशी आणखी एक विक्रम केला आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला चांगली कामगिरी करता आली नसली, तरीही त्यांच्या पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. याच बरोबर देशातील राष्ट्रीय पक्षांचा आकडा वाढून आता ९ वर पोहोचेल.
गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने आतापर्यंत जवळपास १३ टक्के मते मिळविली आहेत. याच बरोबर आता आप गुजरातमध्ये एक प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्षही बनला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना, देशातील नागरिकांना मनापासून धन्यावद, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. आज आपली आम आदमी पार्टी एक राष्ट्रीय पार्टी झाली आहे. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. १० वर्षांआधी आम आदमी पार्टी खूप लहान होती. मात्र आता याच पार्टीचे देशातील दोन राज्यात सरकार आहे. गुजरातमधील नागरिकांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. खूप प्रेम दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, मला खूप काही शिकायला मिळालं. गुजरात भाजपाचा गड मानला जात असून तो भेदण्यात आम्हाला यश मिळालं आहे. पुढील वेळी तो जिंकू, असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी बोलावून दाखवला. आम्ही प्रचारात कधीही कोणावर आरोप केले नाही, शिवीगाळ केली नाही. आम्ही फक्त कामासंदर्भात प्रचार केल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.
राष्ट्रीय पार्टी बनने पर आम आदमी पार्टी के सभी कार्यकर्ताओं और सभी देशवासियों को बधाई। pic.twitter.com/sba9Q1sz1f
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 8, 2022
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी महत्वाच्या अटी -
कुठल्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागत असतात.
- जर एखाद्या पक्षाने चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा मिळवला तर, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
- जर एखाद्या पक्षाने तीन राज्य मिळून लोकसभेत तीन टक्के जागा मिळवल्या तर, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
- जर एखाद्या पक्षाने चार लोकसभा जागांशिवाय संसदीय अथवा विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये ६ टक्के मते मिळविली तर, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
- जर एखाद्या पक्षाने वरील पैकी कुठल्याही तीन अटींपैकी एक अट पूर्ण केल्यास, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
देशात एकूण किती राष्ट्रीय पक्ष -
निवडणूक आयोगानुसार देशात, काँग्रेस, भाजप, बीएसपी, तृणमूल काँग्रेस, एनसीपी, सीपीआय, सीपीआयएम आणि एनपीपी हे आधीपासूनच राष्ट्रीय पक्ष आहेत. एनपीपीला २०१९ मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आपला दिल्ली, पंजाब आणि गोवा या राज्यांमध्ये आधीच राज्य स्थरीय अथवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आपला गोव्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत ६.८ टक्के मते मिळाली आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"