'देवाने मला खास काम देऊन गुजरातला पाठवले आहे...', पोस्टर वादावर केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 09:32 PM2022-10-08T21:32:53+5:302022-10-08T21:33:36+5:30

Arvind Kejriwal : गुजरातमध्ये अनेक ठिकाणी अरविंद केजरीवाल हिंदुविरोधी असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यावरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 

aam aadmi party leader arvind kejriwal rajendra pal gautam oath controversy gujarat poster counterattack bjp insults god | 'देवाने मला खास काम देऊन गुजरातला पाठवले आहे...', पोस्टर वादावर केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

'देवाने मला खास काम देऊन गुजरातला पाठवले आहे...', पोस्टर वादावर केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

Next

आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आज गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, राजेंद्र पाल गौतम यांच्याशी संबंधित वादाचे पोस्टर गुजरातमध्ये लावण्यात आले आहेत. तसेच, गुजरातमध्ये अनेक ठिकाणी अरविंद केजरीवाल हिंदुविरोधी असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये 'मी हिंदू धर्माला वेडा समजतो' असे लिहून अरविंद केजरीवाल यांना दाखवण्यात आले आहे. यावरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 

गुजरातमध्ये येण्याचे ठरले असल्याने त्यांनी (भाजप) वेगवेगळ्या ठिकाणी माझ्याविरोधात पोस्टर्स आणि होर्डिंग्ज लावले आहेत. हे लोक माझा तिरस्कार करतात. त्या पोस्टरवर देवाविरोधात अपशब्द लिहिले आहेत. तुम्ही देवाचा अपमान केला आहे. पोस्टर लावणारे लोक माझा द्वेष करण्यात इतके आंधळे झाले की त्यांनी देवाविरुद्ध अपशब्द लिहिले. मी एक धार्मिक माणूस आहे, हनुमानजींचा कट्टर भक्त आहे. हनुमानजींची माझ्यावर असीम कृपा आहे. माझा जन्म श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी झाला. देवाने मला खास काम देऊन गुजरातला पाठवले आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

दरम्यान, शनिवारी सकाळी गुजरातमधील अनेक शहरांमध्ये रस्त्याच्या बाजूला अरविंद केजरीवालांचे पोस्टर दिसून आले. पोस्टरमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये अरविंद केजरीवाल यांचे टोपी घातलेले फोटो छापण्यात आले आहे. तसेच, हे पोस्टर्स अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि राजकोटसारख्या मोठ्या शहरांमध्ये लावण्यात आले आहेत.

दिल्ली सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्याशी संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप सातत्याने आम आदमी पक्षावर निशाणा साधत आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी नुकतेच बौद्ध महासभेच्या संघटनेत सहभाग घेतला. ज्यामध्ये हिंदूंच्या देवी-देवतांना न मानण्याची शपथ देण्यात आली होती. त्यावेळी मंचावर राजेंद्र पाल गौतमही उपस्थित होते आणि तेही शपथ घेत होते. यावरून भाजपने आम आदमी पक्षाला घेरले आहे.

काल गुजरातमध्ये भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला होता आणि  मंत्री राजेंद्र पाल गौतम यांना हटवण्याची मागणी केली होती. मात्र, राजेंद्र पाल गौतम यांनी शपथविधीशी संबंधित व्हिडिओबाबत म्हटले होते की, भाजप माझ्याबद्दल काही अफवा पसरवत आहे. मी खूप धार्मिक व्यक्ती आहे. मी वैयक्तिकरित्या सर्व देवतांचा आदर करतो. माझ्या कोणत्याही कृतीने किंवा शब्दाने देवी-देवतांचा अपमान व्हावा, असा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही.

Web Title: aam aadmi party leader arvind kejriwal rajendra pal gautam oath controversy gujarat poster counterattack bjp insults god

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.