दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ची जोरदार तयारी, आज पहिली यादी जाहीर करू शकते?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 12:21 PM2024-11-21T12:21:40+5:302024-11-21T12:22:50+5:30
Aam Aadmi Party : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र त्याआधी दिल्लीत नेत्यांचे पक्षांतर सुरू झाले आहे.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी आम आदमी पक्षाने (आप) जोरदार सुरु केली आहे. 'आप'ची आज पीएसीची बैठक आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. यासोबतच उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली जाऊ शकते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र त्याआधी दिल्लीत नेत्यांचे पक्षांतर सुरू झाले आहे. अलीकडेच आपचा राजीनामा देत कैलाश गेहलोत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर भाजपचे माजी नेते आणि दोन वेळा आमदार असलेले अनिल झा यांनी आपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी भाजपचे माजी आमदार ब्रह्मसिंह तन्वर यांनीही आपमध्ये प्रवेश केला होता. ते तीन वेळा आमदार आणि तीन वेळा नगरसेवकही राहिले आहेत.
फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांवर निवडणुका होऊ शकतात. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी २०१५ रोजी संपणार आहे. मात्र, त्यापूर्वी कधीही निवडणुका होऊ शकतात. दिल्लीत सध्या आम आदमी पक्षाचे सरकार आहे. अलीकडेच अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. याआधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.
भाजपनेही सुरू केलीय निवडणुकीची तयारी
दिल्लीत विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपनेही जोरात केली आहे. गेल्या आठवड्यापासून भाजप दिल्लीतील प्रचाराच्या कामाला गती देणार आहे. त्यासाठी भाजपने विशेष आराखडा तयार केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जवळपास १० नगरसेवक आणि माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्याची भाजपची तयारी आहे. भाजप या निवडणुकीत मजबूत पकड आणि चांगली प्रतिमा असलेले नगरसेवक रिंगणात उतरवणार आहे.
२०२० मध्ये आपने मिळवला होता दणदणीत विजय
दिल्लीत विधानसभेच्या जागांची संख्या १७ आहे. बहुमताचा आकडा ३६ आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी ६२ जागा जिंकून पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले होते. त्याचवेळी, भाजपला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले होते. आपला ५३.५७ टक्के तर भाजपला ३८.५१ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला ४.२६ टक्के मते मिळाली होती.