पठाणकोटवरून ‘आप’, भाजपमध्ये रणकंदन
By Admin | Published: April 6, 2016 04:44 AM2016-04-06T04:44:02+5:302016-04-06T04:44:02+5:30
पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर बुधवारी तिखट हल्ला चढवला. दुसरीकडे केजरीवालांच्या ६ आरोपांपैकी ३ आरोपांचे भाजपने
नवी दिल्ली : पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर बुधवारी तिखट हल्ला चढवला. दुसरीकडे केजरीवालांच्या ६ आरोपांपैकी ३ आरोपांचे भाजपने पत्रकार परिषदेत खंडन केले. दिल्लीत बुधवारी पठाणकोटवरून आप व भाजपमधे धुमश्चक्री पाहायला मिळाली.
केजरीवाल म्हणाले, पाकच्या संयुक्त चौकशी पथकाने पठाणकोट हल्ला हे भारताने घडवलेले नाट्य होते, अशी प्रतिक्रिया नोंदवली. या पथकाच्या दौऱ्यातून काय साध्य झाले, असा सवाल करून मोदी आणि नवाज शरीफ यांच्यात नेमके काय डील झाले, ते देशाला समजलेले नाही. हल्ला चढवणाऱ्यांकडूनच केंद्राने तपास व चौकशीची अपेक्षा केल्याने देशाची फसगतच झाली. त्यासाठी मोदींनी देशाची माफी मागितली पाहिजे.
केजरीवालांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देतांना दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय म्हणाले, केजरीवाल आणि आपच्या मंत्र्यांना राज्यघटनेविषयी कोणताही आदर नाही, हे वारंवार सिध्द झाले आहे. आपच्या कपिल मिश्रांनी व्टीटरवर पाकच्या अहवालावर मोदी गप्प का? पंतप्रधान मोदींइतका आयएसआयचा मोठा एजंट कोणी आहे काय?’ अशी भडक प्रतिक्रिया नोंदवली होती. त्यावर उपाध्याय म्हणाले, केजरीवाल व त्यांचे मंत्री पंतप्रधानांना आयएसआय एजंट संबोधतात. देशाला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)