"त्यांना भीती आहे की...", दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भरसभेत रडू कोसळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 03:40 PM2023-06-07T15:40:52+5:302023-06-07T15:41:23+5:30
तुरूंगात असलेल्या सिसोदिया यांच्या कार्याचा उल्लेख करताना अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात बंद असलेल्या मनीष सिसोदिया यांचा उल्लेख करताच त्यांना रडू कोसळले. एका शैक्षणिक संस्थेचे उद्घाटन करताना दिल्लीचे मुख्यमंत्री बोलत होते. मनीष सिसोदिया यांचे हे स्वप्न होते. त्यांनी सुरू केलेली शैक्षणिक क्रांती संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ते होऊ देणार नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले. मनीष सिसोदिया हे एक्साईज पॉलिसी प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत.
दरम्यान, तुरूंगात असलेल्या सिसोदिया यांच्या कार्याचा उल्लेख करताना अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले. "हे त्यांचे स्वप्न होते. या लोकांना दिल्लीची शैक्षणिक क्रांती संपवायची आहे. पण आम्ही ते संपू देणार नाही", असे केजरीवाल यांनी सांगितले.
सिसोदिया यांच्या कार्याचा आढावा सांगताना केजरीवाल यांनी म्हटले, "मनीषजी यांनी याची सुरूवात केली होती. प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळायला हवे हे त्यांचे स्वप्न होते. पण खोटे आरोप आणि खोटे खटले दाखल करून एवढ्या चांगल्या माणसाला इतके महिने तुरुंगात टाकले आहे. त्यांना तुरुंगात का टाकले आहे? देशात इतके मोठे दरोडेखोर फिरत आहेत, त्यांना पकडले जात नाही. त्यांना मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकावे लागले कारण ते चांगल्या शाळा बांधत आहेत, मुलांना चांगले शिक्षण देत आहेत."
#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal gets emotional, as he remembers former education minister Manish Sisodia and his work in the area of education, at the inauguration of an educational institution pic.twitter.com/BDGSSbmpbq
— ANI (@ANI) June 7, 2023
तसेच आज सिसोदीया यांनी चांगले शिक्षण दिले नसते, चांगल्या शाळा बनवल्या नसत्या तर त्यांना तुरूंगात टाकले नसते. एवढे चांगले काम होत असल्याने त्यांना त्रास होत आहे. चांगल्या शाळांमुळे आम आदमी पक्षाचा सर्वत्र प्रचार होत आहे. आम्ही बांधलेल्या शाळांमुळे गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळत आहे. यामुळेच त्यांना त्रास होत आहे, जर मनीष सिसोदिया यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केले नसते तर ते आज तुरुंगात नसते. त्यांचे कार्य आपण सुरूच ठेवू आणि आशा करू की ते लवकरच बाहेर येतील, असे केजरीवाल यांनी अधिक सांगितले.