आम आदमी पार्टीचे 'स्टिंग'

By Admin | Published: September 9, 2014 03:59 AM2014-09-09T03:59:47+5:302014-09-09T03:59:47+5:30

राजधानी दिल्ली सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच भारतीय जनता पार्टी (भाजपा) आमदारांना विकत घेण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने (आप)केला आहे.

Aam Aadmi Party's 'Sting' | आम आदमी पार्टीचे 'स्टिंग'

आम आदमी पार्टीचे 'स्टिंग'

googlenewsNext

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच भारतीय जनता पार्टी (भाजपा) आमदारांना विकत घेण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने (आप)केला आहे. या आरोपाच्या पुराव्यादाखल आपने एक स्टिंग ऑपरेशन केले आहे. दिल्लीचे भाजपा उपाध्यक्ष शेरसिंह डागर हे आप आमदाराला पक्ष सोडण्यासाठी चार कोटी रुपयांचा प्रस्ताव देत असल्याचे या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसत आहे. तथापि डागर यांनी हा आरोप धुडकावून लावला असून आपल्या चुकीच्या पद्धतीने गोवण्यात येत असल्याचा प्रतिआरोप केला आहे.
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज सोमवारी येथील पत्रपरिषदेत, हे स्टिंग ऑपरेशन उघड केले. संगम विहारचे आपचे आमदार दिनेश मोहनिया यांना डागर पक्ष सोडण्यासाठी चार कोटी रुपयांची ऑफर देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 
केजरीवाल या स्टिंग ऑपरेशनचे रॉ फुटेज उद्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयास सोपवणार असून निवडणूक आयोगाकडेही जाणार आहे. भाजपाकडे दिल्लीत सरकार बनविण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. त्यांच्याकडे संख्याबळ असेल तर त्यांनी सरकार बनवावे पण आम्ही अनैतिक मार्गाने त्यांना सरकार स्थापन करू देणार नाही, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले. भाजपाने आमच्या आमदारांना विकत घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यांना अनेक आमिषे दिली जात आहेत, असेही ते म्हणाले.
दिल्लीच्या सत्तेसाठी भाजपा आतूर!
दिल्लीचे तख्त बळकावण्यासाठी भाजपा सज्ज झाली असून आता केवळ भाजपाला नायब राज्यपालांच्या सत्ता स्थापनेच्या निमंत्रणाची प्रतीक्षा आहे. आम्ही दिल्लीत सरकार स्थापन करू नायब राज्यपालांच्या निमंत्रणाची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे वरिष्ठ सरकारी सूत्रांनी आज सोमवारी सांगितले.
नायब राज्यपालांचे निमंत्रण मिळताच भाजपा नेतृत्व एक बैठक बोलवून या बैठकीत दिल्लीत सत्ता स्थापनेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल, असे स्पष्ट संकेत आहेत. 
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना आज याबाबत विचारले असता, तूर्तास याबाबत माझ्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही. सध्या हा मुद्दा राष्ट्रपती आणि नायब राज्यपाल यांच्यात आहे, असे त्यांनी सांगितले. 
भाजपाकडे तूर्तास २९ आमदार आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना आणखी पाच आमदारांचा पाठिंबा हवा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपमधून बडतर्फ करण्यात आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी आणि अन्य एक अपक्ष आमदार भाजपाला पाठिंबा देण्यास तयार आहे. पण याउपरही भाजपाला आणखी तीन आमदारांचा पाठिंबा हवा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Aam Aadmi Party's 'Sting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.