आमिरने भारताची प्रतिमा मलीन केली
By admin | Published: January 19, 2016 01:19 PM2016-01-19T13:19:10+5:302016-01-19T13:23:33+5:30
असहिष्णूतेबाबत वक्तव्य करून आमिरने देशाची प्रतिमा मलिन केली' असे सांगत 'अतुल्य भारत' कॅम्पेनमागचा प्रमुख चेहरा असलेल्या अमिताब कांत यांनी आमिरच्या हकालपट्टीचे समर्थन केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १९ - देशातील असहिष्णूतेबद्दल वक्तव्य केल्यामुळे अभिनेता आमिर खानला 'अतुल्य भारत' मोहमेच्या ब्रँड अँम्बेसेडरपदावरून काढण्यात आल्याच्या निर्णयावरून बरीच उलट-सुलट चर्चा होत आहे. मात्र ' असहिष्णूतेबाबत वक्तव्य करून आमिरने देशाची प्रतिमा मलिन केली' असे सांगत या मोहिमेमागील प्रमुख चेहरा असलेले औद्योगिक धोरण आणि प्रसार विभागाचे (DIPP - इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन डिपार्टमेंट) सचिव अमिताभ कांत यांनी आमिरच्या हकालपट्टीचे समर्थन केले आहे. सोमवारी अहमदाबादमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
' ब्रँड अँम्बेसेडर हा एखाद्या ब्रँडचे प्रमोशन करत असतो. भारत हा अतुल्य आहे असा प्रसार जर या मोहिमेच्या ब्रँड अँम्बेसडरने केला तरच परदेशातील पर्यटकांचा भारताकडे ओढा वाढेल. पण जर देशाचा ब्रँड अँम्बेसेडरच भारत असहिष्णू असल्याचे वक्तव्य करत असेल तर तो त्याचे नेमून दिलेले काम व्यवस्थित करत नाही, हे स्पष्ट होते ' असे कांत यांनी सांगितले. ' आमिरने या देशाची ओळख, प्रतिमा मलीन केली आहे. त्याचे वक्तव्य ऐकल्यानंतर इतर देशातील नागरिक भारतात येणार नाही. ब्रँड अँम्बेसेडरचे काम हे त्या ब्रँडचा प्रसार करणे असते, त्याची ओळख नष्ट करणे नव्हे' असे नमूद करत कांत यांना आमिरच्या हकालपट्टीचे समर्थनच केले.
पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जावे का? अशी विचारणा केल्याचे सांगत आमीरने देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशातील असुरक्षित वातावरणात मुलांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली होती. मात्र त्याच्या या वक्तव्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, अनेकांनी त्याला देश सोडून जाण्याचा सल्लाही दिला होता. त्याचे हे वक्तव्य त्याला भलतेच महागात पडले. देशातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयातर्फे चालवण्यात येणा-या 'अतुल्य भारत' या कॅम्पेनच्या ब्रँड अँम्बेसडर पदावरून त्याला काढून टाकण्यात आले. त्यावर ' सरकारकडून देशासाठी जे सर्वोत्तम असेल, त्याचदृष्टीने पुढची पावलं उचलली जातील अशी मला खात्री आहे. तसेच, मी ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो तरी आपला देश हा अतुल्यच राहणार' असे आमिरने म्हटले होते.