'अतुल्य भारत'च्या ब्रँड अॅम्बेसेडर पदावरून आमिरची हकालपट्टी

By admin | Published: January 6, 2016 03:38 PM2016-01-06T15:38:23+5:302016-01-06T15:51:00+5:30

देशातील असहिष्णूतेबद्दल वक्तव्य करणे आमिर खानला महागात पडले असून अतुल्य भारत' या कॅम्पेनच्या ब्रँड अँम्बेसडर पदावरून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे.

Aamir's expulsion from 'Incredible India' brand ambassador | 'अतुल्य भारत'च्या ब्रँड अॅम्बेसेडर पदावरून आमिरची हकालपट्टी

'अतुल्य भारत'च्या ब्रँड अॅम्बेसेडर पदावरून आमिरची हकालपट्टी

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवले होते असे वक्तव्य करून अनेकांच्या टीकेचा रोष पत्करावा लागलेल्या आमिरला हे विधान भलतेच महागात पडले आहे. देशातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयातर्फे चालवण्यात येणा-या 'अतुल्य भारत' या कॅम्पेनच्या ब्रँड अँम्बेसडर पदावरून आमिरला काढण्यात आल्याचे वृत्त 'बिझनेस स्टँडर्ड'ने दिले आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना आमिरने असहिष्णूतेच्या मुद्यावर हे वक्तव्य केले होते. तसेच या घटनांच्या विरोधात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीचेही त्याने समर्थन केले होते.  ' या देशात काय घडतयं ते आम्ही रोज वृत्तपत्रातून वाचत असतो, पहात असतो. गेल्या काही महिन्यात देशात घडलेल्या घटनांबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत ते धक्कादायक आहेत. जे घडतयं, त्यामुळे मी चिंतित झालो, हे नाकबूल करणार नाही. विशेषत: गेल्या सहा ते आठ आठवड्यात देशातील असुरक्षितता, भय वाढले आहे' असे आमिर म्हणाला होता. 'आपण भारत सोडूया का असा प्रश्न किरणने धास्तीपोटी मला विचारला होता. सभोवतालच्या वातावरणामुळे ती चिंतातुर झाली, मुलांची तिला काळजी वाटते. रोज पेपर उघडतानाही ती घाबरलेली असते. किरणने मला असा प्रश्न विचारणे माझ्यासाठी धक्कादायक होते, पण भोवती असलेल्या अस्वस्थतेचे ते द्योतक असल्याचे आमिर म्हणाला. यावेळी त्याने राजकारण्यांवरही निशाणा साधला. आपली काळजी घेण्यासाठी आपण निवडून दिलेल्या लोकांनी, नेत्यांनी खंबीरपणे पावले उचलणे, कायदा हातात घेणा-यांविरोधात कडक कारवाई करणे अपेक्षित असते. पण तसे होत नसल्यामुळेच असुरक्षिततेची भावना वाढत चालली असल्याचे सांगत त्याने राजकारण्यांवर टीका केली होती. 
त्याच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर चहूबाजूंनी टीका झाली, अनेकांनी त्याला देश सोडून जायचा सल्लाही दिला होता. त्यानंतरही आपल्या वक्तव्यावर ठाम राहत आमिरने आपण किंवा आपली पत्नी भारत कधीही सोडणार नसल्याचा खुलासा केला होता. मात्र, त्याच्या या खुलाशनंतरही पर्यटन मंत्रालयाने त्याला ब्रँड अॅम्बेसेडर पदावरून काढून टाकल्याने आमिरला चांगलाच फटका बसल्याचे समजते. 

Web Title: Aamir's expulsion from 'Incredible India' brand ambassador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.