आमीरच्या वक्तव्याने असहिष्णुतेचे वादळ!

By admin | Published: November 25, 2015 04:11 AM2015-11-25T04:11:13+5:302015-11-25T04:11:13+5:30

देशात असहिष्णुता वाढल्यामुळे आपली पत्नी किरण देश सोडून जाण्याच्या विचारात असल्याच्या सुपरस्टार आमीर खान याच्या वक्तव्यामुळे रान पेटले असून आमीरवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली आहे.

Aamir's remarks intimidation storm! | आमीरच्या वक्तव्याने असहिष्णुतेचे वादळ!

आमीरच्या वक्तव्याने असहिष्णुतेचे वादळ!

Next

नवी दिल्ली : देशात असहिष्णुता वाढल्यामुळे आपली पत्नी किरण देश सोडून जाण्याच्या विचारात असल्याच्या सुपरस्टार आमीर खान याच्या वक्तव्यामुळे रान पेटले असून आमीरवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. आमीरचे वक्तव्य देशाची प्रतिमा मलीन करणारे असल्याची तीव्र प्रतिक्रिया केंद्र सरकारने दिली असून भाजपानेही आमीरला फैलावर घेत काही लोक कर वाचविण्यासह अनेक कारणांनी विदेशात स्थायिक होता, असा टोला लगावला आहे. काँग्रेसने मात्र आमीर जे बोलला, तेच संपूर्ण जग बोलत असल्याचे सांगत ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’च्या वक्तव्याचे पूर्ण समर्थन केले आहे. सोशल मीडियावर मात्र अनेकांनी आमिर खानची बाजू घेतली व आज आमिर जे बोलला तेच याआधी इतरांनीही बोलून दाखविले आहे. पण त्यांना कोणी देश सोडून जायला सांगितले नाही, याची आठवण करून दिली.
दोन डझनांहून अधिक साहित्यिक व कलावंतांच्या ‘पुरस्कार वापसी’ने अहिष्णुततेचा मुद्दा तापला होताच. संसद अधिवेशन सुरु होण्याच्या तोंडावर आमिर खानच्या विधानाने त्यास पुन्हा धार चढली आणि ते सूत्र पकडून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी एकत्रित व्यूहरचना आखून संसदेत याच मुद्द्यावर

सरकारला खिंडीत पकडण्याची तयारी सुरु केली.
दिवसभर काँग्रेस आणि भाजपाचे वाक्युद्ध सुरु राहिले. उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पाठोपाठ मल्लिकार्जून खरगे, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपावर हल्ला केला. भाजपाने शाहनवाज हुसैन, मुख्तार अब्बास नक्वी, किरेन रिजिजू यांना मैदानात उतरवून आमिर खान व त्याच्या आडून काँग्रेसवर पलटवार केले. अनुपम खेर यांच्या पाठोपाठ चित्रपट सृष्टीतील अनेकांनी सोशल मीडियावर भाष्य करून आमिर खानला फैलावर घेतले. दरम्यान, मंगळवारी दिल्लीच्या न्यू अशोक नगर ठाण्यात एका लघुपट दिग्दर्शकाने आमीरविरुद्ध तक्रारही दाखल केली.
नवी दिल्लीत सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना आमीरने देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेविरोधात कलावंतांनी सुरू केलेल्या ‘पुरस्कार वापसी’चे समर्थन केले होते. शिवाय मुलांच्या सुरक्षेच्या चिंतेने ग्रासलेल्या आपल्या पत्नीने देश सोडून जाण्याचा विचार बोलून दाखवला होता, अशी पुस्तीही जोडली होती. आमीरच्या या वक्तव्यावर मंगळवारी देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. असहिष्णुतेबाबतची आमीरची टिप्पणी गैर व निरुपयोगी आहे. अशी विधाने देशासाठीच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही अपमानास्पद आहेत. या वक्तव्याने देशाची प्रतिमा डागाळली आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी दिली. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील सांप्रदायिक घटना कमी झाल्या आहेत, असा दावाही त्यांनी केला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)


भारतानेच तुम्हाला
‘स्टार’ बनवले विसरू नका- भाजपा
भारतानेच तुम्हाला ‘स्टार’ बनवले, हे विसरू नका, अशा शब्दांत भाजपाने आमीरला फैलावर घेतले. देश सोडून जाण्याबाबतच्या वक्तव्यावरही तिखट प्रतिक्रिया नोंदवत, काही लोक कर वाचविण्यासोबतच अन्य कारणांसाठी विदेशात जातात, असे भाजपाने म्हटले. आमीर व त्यांचे कुटुंब भारत सोडून जाऊन जाऊन कुठे जाणार? असा सवाल भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी मंगळवारी केला. मुस्लिमांसाठी भारतासारखा चांगला देश अन्य कुठलाही नाही. मुस्लीम राष्ट्रे व युरोपात काय स्थिती आहे, हे तुम्ही पाहतच आहात, असेही ते म्हणाले. भाजपा प्रवक्ते नलिन कोहली यांनीही आमीरवर टीकास्त्र सोडले. लहानसहान अतिरेकी घटनांवरून भारताची व्याख्या करता कामा नये, असे ते म्हणाले. आमीरचे वक्तव्य दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.
——————————-
आमिर खानला इतकी वर्ष आम्ही भरभरुन प्रेम दिले. मात्र त्याच्या वक्तव्यानंतर असे वाटतेय की, इतके वर्ष आम्ही सापाला दूध पाजले. देश सोडून पाकिस्तानात जायचे असेल, तर आमिरने लवकरात लवकर जावे.
- रामदास कदम, पर्यावरण मंत्री,
..........................................
पंतप्रधान मोदी यांनी आता सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्व पक्षांच्या नेत्यांच्या सह्या घेऊन संयुक्त निवेदन जारी करावे. असहिष्णुतेबद्दल देशातील बुद्धिजीवी लोकांच्या मनात भीती आहे. पंतप्रधानांनी निवेदन केल्यास लोकांच्या मनातील भीती कमी होईल, आणि या चर्चेला पूर्णविराम मिळेल. अनुपेम खेर यांच्या सारख्यांनी काश्मीरमध्ये जाऊन राहावे, आणि नंतर देशात असहिष्णुता नसल्याचे सांगावे.
- नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे
आमीरच्या घरासमोर निदर्शने; पाच अटकेत
आमीर खानच्या वांद्रे येथील हिल व्ह्यू अपार्टमेंटमधील निवासस्थानासमोर मंगळवारी दुपारी हिंदू संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यातील पाच जणांना वांद्रे पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्यानंतर आमीरच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
सरकार व मोदींवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना देशद्रोही, पूर्वग्रहदूषित ठरविण्यापेक्षा जनतेत मिसळा, त्यांच्या समस्या जाणून घ्या, असे टिष्ट्वट राहुल यांनी केले.
प्रिय आमीर, ‘अतुल्य भारत’ ही जाहिरात करून तू भारताची महती सांगतोस. मग अगदी सहा-आठ महिन्यांतच हा ‘अतुल्य भारत’ तुझ्यासाठी ‘असहिष्णू भारत’ कसा झाला? समजा देशात असहिष्णुता वाढली, असे एकवेळ गृहीत धरू. मग अशा स्थितीत तू लाखो भारतीयांना देश सोडून जाण्याचाच सल्ला देशील का?
- अनुपम खेर, बॉलिवूड अभिनेते
आमीरच्या वक्तव्यापेक्षा कर्नल
संतोष महाडिक यांचे बलिदान
महत्त्वाचे आहे.
- शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष
देश सोडून जाणाऱ्यांना कुणी अडवले आहे? ज्यांना जायचे त्यांनी खुश्शाल जावे. देशाची लोकसंख्या तेवढीच कमी होईल.
- योगी आदित्यनाथ, भाजपा खासदार
आमीरने बोललेला प्रत्येक शब्द खरा आहे. बोलण्याचे धैर्य दाखवल्याबद्दल
मी त्याचे अभिनंदन करतो.
-अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री

Web Title: Aamir's remarks intimidation storm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.