आमिरचे वक्तव्य; पतीशी वादानंतर पत्नीची आत्महत्या
By Admin | Published: November 27, 2015 12:29 AM2015-11-27T00:29:53+5:302015-11-27T00:29:53+5:30
चित्रपट अभिनेता आमिर खान याने देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत दिलेल्या वक्तव्यावरून एका दाम्पत्यात झालेल्या वादाचे पर्यवसान पत्नीच्या
जबलपूर : चित्रपट अभिनेता आमिर खान याने देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत दिलेल्या वक्तव्यावरून एका दाम्पत्यात झालेल्या वादाचे पर्यवसान पत्नीच्या आत्महत्येत झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात घडली.
मयंक आणि सोनम पांडे हे दाम्पत्य बुधवारी सकाळी आपल्या घरी आमिर खान याने असहिष्णुतेबाबत दिलेल्या वक्तव्यावर चर्चा करीत होते. यावरून पती-पत्नीत हास्यविनोदही रंगला होता. मयंकने गमतीतच ‘आमिर कसा पती आहे, आपल्या बायकोच्या सांगण्यावरून विदेशात वास्तव्याचा विचार करतोय,’ अशी खिल्ली उडविली; परंतु आमिरची चाहती असलेल्या सोनमला ते आवडले नाही. ती लगेच उठून आपल्या खोलीत गेली. त्यानंतर काही वेळातच तिची किंचाळी ऐकायला आली. मयंकने खोलीचे दार उघडले तेव्हा त्याला धक्काच बसला. सोनमने विष प्राशन केले होते. तिला रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु दुपारी ४ वाजताच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. मयंक आणि सोनमचा २४ जून २०१२ रोजी विवाह झाला होता. (वृत्तसंस्था)
आमिर खानने अलीकडेच नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात वाढत्या असहिष्णुतेमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून आपल्या पत्नीने आपण हा देश सोडून जायला हवे काय, अशी विचारणा केली असल्याचे म्हटले होते.