आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांच्याकडे सोपवली नवी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 05:35 PM2023-12-16T17:35:49+5:302023-12-16T17:38:50+5:30
संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत राघव चड्ढा यांना राज्यसभेत आम आदमी पक्षाचे नेते बनवण्यात आले आहे.
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने (आप) राज्यसभाखासदार राघव चढ्ढा यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवली आहे. खासदार संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांना राज्यसभेत पक्षनेते केले आहे. खासदार संजय सिंह यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत राघव चड्ढा यांना राज्यसभेत आम आदमी पक्षाचे नेते बनवण्यात आले आहे. दरम्यान, 24 जुलै रोजी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी मणिपूरमधील घटनेबाबत सभापतींच्या खुर्चीसमोर निदर्शने केली होती. त्यानंतर त्यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते.
राघव चढ्ढा हे आम आदमी पक्षातील एक प्रमुख चेहरा असून ते पक्षाच्या वतीने राज्यसभेत बोलत असतात. नुकतेच ते केंद्रीय निवडणूक आयुक्तांशी संबंधित विधेयकावरील चर्चेदरम्यान बोलत होते. त्यांचे हे भाषण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. राज्यसभेत आम आदमी पक्षाचे 10 खासदार आहेत. यामध्ये सर्वाधिक सात खासदार पंजाबचे आहेत. दिल्लीतून तीन खासदार आहेत. राघव चढ्ढा हे पंजाबचे राज्यसभा खासदार आहेत.
This Bill poses a clear and present danger to the very essence of our democracy.
— Raghav Chadha (@raghav_chadha) December 12, 2023
India, celebrated as the ‘Mother of Democracy’, will be known for ‘Mockery of Democracy’ after this Bill is passed.
My humble appeal: The faith people have in our democracy is our strength; let's… pic.twitter.com/XsbrhCINjz
राघव चढ्ढा यांचे करण्यात आले होते निलंबन
दरम्यान, गेल्या अधिवेशनात 11 ऑगस्ट 2023 रोजी राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले होते. या निर्णयाला राघव चढ्ढा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची भेट घेऊन अर्ज करण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर 115 दिवसांनी राघव चढ्ढा यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते.