वादविवादांचा पक्ष बनलाय ‘आप’
By admin | Published: September 6, 2016 04:14 AM2016-09-06T04:14:13+5:302016-09-06T04:14:13+5:30
आम आदमी पक्ष दिल्लीपासून ते पंजाबपर्यंत वादात अडकलेला दिसत आहे.
नितीन अग्रवाल,
नवी दिल्ली- आम आदमी पक्ष दिल्लीपासून ते पंजाबपर्यंत वादात अडकलेला दिसत आहे. पंजाबमध्ये तिकीट वाटपावरून महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप होत आहे. हे आरोप करणारी व्यक्ती पक्षाची आमदार आहे, हे विशेष.
सेक्स सीडी कांडप्रकरणी आरोप असलेले आपचे माजी मंत्री संदीप कुमार यांच्याबाबतचा वाद शांत होत नाही तोच नवा वाद उत्पन्न झाला आहे. पक्षाच्या एका आमदाराने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहून सांगितले आहे की, पंजाबात तिकीट देण्यासाठी महिलांचे लैंगिक शोषण केले जात आहे. दिल्लीतील बिजवासनचे आमदार कर्नल देवेंद्र सहरावत यांनी हे पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे की, पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मला ही माहिती दिली आहे. मला वाटते की, आप आणि दिल्लीचे अन्य आमदार यापासून अनभिज्ञ आहेत. संजय सिंह, दुर्गेश पाठक आणि दिल्लीचे पक्षाचे प्रतिनिधी पंजाबमध्ये काय करीत आहेत. दिलीप पांडेही दिल्लीत असेच काही करीत आहेत. त्यांचे मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर येत आहेत. दरम्यान, पंजाबचे प्रभारी संजय सिंह यांनी आमदार सहरावत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजप आणि अकाली दल आपल्याला बदनाम करण्याचे कारस्थान करीत असल्याची टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच आपचे माजी नेते हरदीप सिंह किंगरा यांनी पक्षाचे नेते संजय सिंह आणि दुर्गेश पाठक यांच्यावर तिकिटासाठी पैसे घेत असल्याचा आरोप केला होता.
तीन दिवसांची कोठडी
सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या संदीप कुमारच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ झाली आहे. संदीप कुमारला पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर हजर केले होते. तत्पूर्वी पोलिसांनी संदीप यांचे माजी सचिव प्रवीण कुमारला ताब्यात घेतले. मोबाईलमधील सेक्स क्लिपवरून प्रवीण ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप संदीप यांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप यांचे असे म्हणणे आहे की, प्रवीण २० लाख रुपये मागत होता.
वाद आणि वाद
काही दिवसांपूर्वीच पंजाबचे पक्षाचे संयोजक सुच्चा सिंह यांना पैसे घेऊन तिकीट देण्याच्या आरोपावरून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. आमदार शरद चौहान यांच्यावरही एका कार्यकर्त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये शोषणाचे आरोप केले होते. कोंडलीचे आमदार मनोज कुमार यांच्यावर त्यांच्या पत्नीने घरातून बाहेर काढल्याचा आरोप केला आहे. कायदा मंत्री जितेंद्र तोमर कायद्याच्या बोगस पदवी प्रकरणात अडकले. आपच्या २८ आमदारांवर दुहेरी लाभप्रकरणी टांगती तलवार आहे. याशिवाय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून आणि अन्य काही निर्णयांवरून उप राज्यपाल नजीब जंग आणि केजरीवाल यांच्यात वाद होत आहेत.
पक्षाचा निधी घटतोय
आपला मिळणाऱ्या निधीवर या सर्व बाबींचा परिणाम होत आहे. पक्षाला निधी देणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. २०१४ मध्ये पक्षाला एका दिवसात १५०० नागरिक निधी देत होते; पण जूनच्या तिसऱ्या आठवड्यात ही संख्या ४० पेक्षाही कमी राहिली आहे. आता तर पक्षाने निधीचे अपडेट देणे बंद केले आहे. पक्षाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार दिल्लीनंतर पक्षाला सर्वात अधिक निधी महाराष्ट्रातून मिळाला आहे. केजरीवाल यांनीही याबाबत काळजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, पक्षाकडे निवडणुकांसाठी पैसे नाहीत.
>संदीप कमुारच्या स्वीय सचिवाला घेतले ताब्यात
आम आदमी पार्टीचे निलंबित मंत्री संदीप कुमार यांचा स्वीय सचिव प्रवीण कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपली सार्वजनिक प्रतिमा नष्ट करण्याची धमकी देत तो ब्लॅकमेल करायचा, असा आरोप संदीप कुमार यांनी केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. सोमवारी सकाळी दिल्ली सचिवालयातून त्याला ताब्यात घेण्यात आले. नंतर त्याला सुलतानपुरी पोलिस ठाण्यात नेऊन तेथे संदीपसमक्ष त्याची चौकशी करण्यात आली, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. प्रवीण कुमार अकाऊंट्स आणि आॅडिट विभागात कारकून होता. मंत्री झाल्यानंतर संदीपने त्याला प्रतिनियुक्तीवर स्वीय सचिव केले. प्रवीण संदीपचा विश्वासू सहकारी होता. दोघे एकाच ठिकाणी रहायचे. कथित सेक्स सीडी प्रवीणनेच वितरित केली, असा पोलिसांना संशय आहे, असे सूत्रांनी सांगितले.