तुमच्या ५५ जागा येणार आहेत तर उमेदवारांना फोन करायची काय गरज?; भाजपवर भडकले अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 22:51 IST2025-02-06T22:50:43+5:302025-02-06T22:51:21+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

AAP chief Arvind Kejriwal has reacted to the exit polls of the Delhi Assembly elections | तुमच्या ५५ जागा येणार आहेत तर उमेदवारांना फोन करायची काय गरज?; भाजपवर भडकले अरविंद केजरीवाल

तुमच्या ५५ जागा येणार आहेत तर उमेदवारांना फोन करायची काय गरज?; भाजपवर भडकले अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal on Delhi Exit Polls: दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवारी मतदान पार पडलं. दिल्ली निवडणुकीचे ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. भाजपला ११ पैकी नऊ एक्झिट पोलमध्ये बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे. तर दोन एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्ष सत्तेत येणार असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलनुसार २७ वर्षांनंतर भाजप दिल्लीत सत्तेत परतण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आपचे प्रमुख आणि माझी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर मोठा आरोप करत आमच्या उमेदवारांना सतत फोन येत असल्याचे म्हटलं आहे.

दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांवर मतदान झाल्यानंतर विविध यंत्रणांच्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असे म्हटलं जात आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. मात्र आम आदमी पक्षाने बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे आकडे नाकारले होते. सर्वेक्षण करणाऱ्यांनी आमच्या कामगिरीला कमी लेखले आहे, असं आपने म्हटलं होतं. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी एक्झिट पोलवर भाष्य केलं.

दिल्लीत मतदान झाल्यानंतर आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्षाकडून सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर मोठा आरोप करत आमच्या उमेदवारांना सतत फोन येत असल्याचे सांगितले. आमच्या उमेदवारांना आम आदमी पक्ष सोडून त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी १५ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्ष दिल्लीत निवडणूक लढविणाऱ्या आमच्या पक्षाच्या उमेदवारांना फोन करून कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवत असल्याचा आरोप केला.

"शिव्या देणाऱ्या पक्षाला ५५ पेक्षा जास्त जागा मिळत असल्याचे काही एजन्सी दाखवत आहेत. गेल्या दोन तासांत आमच्या १६ उमेदवारांना 'आप' सोडून त्यांच्या पक्षात जाण्यास सांगणारे फोन आले आहेत. आम्ही तुम्हाला मंत्री बनवू आणि प्रत्येकी १५ कोटी रुपये देऊ असं त्यांना सागण्यात येत आहे," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

"त्यांच्या पक्षाला ५५ पेक्षा जास्त जागा मिळणार असतील तर आमचे उमेदवार बोलवायची काय गरज आहे? वातावरण निर्माण करून काही उमेदवारांना पराभूत व्हावे, यासाठी बनावट सर्वेक्षण करण्यात आले आहे. पण तुम्ही शिव्या द्या, आमचा एकही उमेदवार फुटणार नाही," असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, आपचे खासदार संजय सिंह यांनी दावा केला की पक्षाच्या सात आमदारांना भाजपकडून फोन आले आहेत, ज्यांनी त्यांना आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये सामील होण्यासाठी १५ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. आम्ही आमदारांना असे ऑडिओ कॉल रेकॉर्ड करण्यास आणि त्याबद्दल तक्रार करण्यास सांगितले आहे. कुणी भेटले तर त्याचा छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवण्यास सांगितले आहे. मतमोजणीपूर्वीच भाजपने आपला पराभव मान्य केला असून देशाच्या इतर भागांप्रमाणे दिल्लीतही भाजपने पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू केले आहे.

Web Title: AAP chief Arvind Kejriwal has reacted to the exit polls of the Delhi Assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.