'आप'च्या नगरसेविकेला लाच घेताना CBI ने केली अटक, शेंगा विक्रेता मध्यस्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 09:11 AM2022-02-19T09:11:01+5:302022-02-19T09:20:21+5:30
गीता रावत यांच्या अटकेनंतर राजधानी दिल्लीतील राजकारण चांगलंच तापलं आहे. रावत यांनी आपल्या घरावर छत टाकण्यासाठी अवैधपणे ही लाच घेतली होती.
नवी दिल्ली - सीबीआयने आम आदमी पक्षाच्या एका नगरसेविकेला लाच घेताना रंगेहाथ अटक केली. आपच्या नेत्या आणि नगरसेविका गीता रावत यांनी 20 हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेंगा विकणाऱ्या व्यक्तीकडून हा पैसा गीता रावत यांच्याकडे पोहोचविण्यात आला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या विधानसभाक्षेत्र पटपडगंज येथील विनोद नगर वार्डातून गीता रावत यांना अटक करण्यात आली आहे.
गीता रावत यांच्या अटकेनंतर राजधानी दिल्लीतील राजकारण चांगलंच तापलं आहे. रावत यांनी आपल्या घरावर छत टाकण्यासाठी अवैधपणे ही लाच घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या मुलास अटक झाल्याचे शेंगा विक्रेते सनाउल्लाह यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले, तसेच मुलाला अटक करण्याचे कारणही विचारले. त्यावेळी, सीबीआयने त्यांची ओळख सांगून काही वेळातच तुम्हाला समजेल, असं उत्तर दिलं. सीबीआयने संपूर्ण घटनेचा खुलासा केला.
केजरीवाल जी "आप" की यह कैसी ईमानदारी, रिश्वत लेते हो रही आपके नेताओं की गिरफ़्तारी?
— BJP Delhi (@BJP4Delhi) February 18, 2022
अब क्या नया बहाना बनाएंगे आप? pic.twitter.com/LkHq9i36NX
नगरसेविकास गीता रावत या शेंगा विक्रेत्याद्वारे लाच घेत होत्या. सीबीआयने माहिती घेतल्यानंतर या नोटाला रंग लावून शेंगा विक्रेत्याकडे पैसे दिले होते. तेच पैसे गीता रावत यांना देत असताना शेंगा विक्रेत्यासह गीता रावत या दोघांनाही सीबीआयने अटक केली. सीबीआयच्या पथकाने संबंधित नोटा जप्त करुन दोघांनाही सोबत नेले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर भाजपने आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. दिल्ली भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन, “केजरीवाल जी “आप” की यह कैसी ईमानदारी, रिश्वत लेते हो रही आपके नेताओं की गिरफ़्तारी? असे खोचक ट्विट केलं आहे. तर, आता कुठलं नवीन कारण देणार आपण? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.