लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच गोव्यात आपचे दोन्ही उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 11:37 AM2019-02-22T11:37:35+5:302019-02-22T11:39:40+5:30
लोकसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. पण आम आदमी पक्षाने त्या घोषणेपूर्वीच गोव्यातील एकूण दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार नुकतेच जाहीर करून टाकले आहेत.
पणजी : लोकसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. पण आम आदमी पक्षाने त्या घोषणेपूर्वीच गोव्यातील एकूण दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार नुकतेच जाहीर करून टाकले आहेत. भाजपा आणि काँग्रेसच्या विरोधात आम आदमी पक्ष लढणार आहे. त्यासाठी उत्तर गोव्यात प्रदीप पाडगावकर तर दक्षिण गोव्यात एल्वीस गोम्स असे दोन उमेदवार पक्षाने अधिकृतरित्या जाहीर केले. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात ख्रिस्ती मतदारांची संख्या ब-यापैकी आहे. विशेषत: सासष्टी आणि मुरगाव या दोन तालुक्यांमध्ये दहा ते अकरा विधानसभा मतदारसंघ असून तिथे ख्रिस्ती मतदारांची संख्या ही खूप आहे. मुरगाव तालुक्यापेक्षा सासष्टीत तर जास्तच आहे. सांगे, केपे, काणकोण, फोंडा अशा तालुक्यांमध्येही ख्रिस्ती मतदार आहेत पण त्यापेक्षा तिथे हिंदू मतदार खूप जास्त आहेत. दक्षिण गोव्यात अनुसूचित जमातींमधीलही (एसटी) मतदारांची संख्या बरीच आहे. त्यात ख्रिस्ती आणि हिंदू एसटींचा समावेश होतो. या सगळ्य़ाचा विचार करून आपने एल्वीस गोम्स यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. गोम्स हे गोवा सरकारच्या सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन बाहेर आले व मग ते आम आदमी पक्षाचे निमंत्रक बनले. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी गोम्स यांचे नाते एकदम चांगले आहे. गोम्स हा स्वच्छ चेहरा म्हणून ओळखला जातो.
2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही आम आदमी पक्षाने निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच बरेच उमेदवार जाहीर केले होते. त्यावेळी बाणावली, म्हापसा, पणजी व अन्य काही मतदारसंघांमध्ये आपला ब-यापैकी मते मिळाली होती. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात पाडगावकर यांना प्रथमच तिकीट जाहीर केले गेले आहे. पाडगावकर हे आपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. तेही स्वच्छ प्रतिमेचे असून ते आपचे सक्रिय पदाधिकारी आहेत. गोव्यात मतदारांची एकूण संख्या अकरा लाखांपेक्षा जास्त झालेली आहे. यापैकी बरेच मतदार हे भाजपा, काँग्रेस, मगोप, गोवा फॉरवर्ड अशा पक्षांमध्ये विभागले गेले आहेत. आपचेही समर्थक गोव्यात आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी आम आदमी पक्षाने गोव्यात आपली सगळी शक्ती वापरण्याचे ठरवले आहे.