केजरीवाल यांचा दावा, “भगवंत मान यांच्यासह मंत्र्यांना माफियांकडून लाच देण्याचा प्रयत्न”; काँग्रेस म्हणाली नावं सांगा…
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 07:57 PM2022-04-18T19:57:41+5:302022-04-18T20:00:17+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (AAP National Convener Arvind Kejriwal) यांनी काही गंभीर दावे केले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (AAP National Convener Arvind Kejriwal) यांनी काही गंभीर दावे केले आहेत. पंजाबमध्ये आपचं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक बड्या माफियांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann), मंत्री, पक्षाचे आमदार आणि नेत्यांना त्यांनी लाच देण्याबाबत सांगितल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला. त्यानंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमिरिंदर सिंग राजा वाडिंग (Punjab Congress President Amarinder Singh Raja Vading) यांनी केजरीवाल यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसंच त्या माफियांची नावं सांगण्याचीही मागणी केली आहे.
वाडिंग यांनी केजरीवाल आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांना ज्यांनी लाच देण्याचे प्रयत्न केले त्या माफियांच्या नावाचा पर्दाफाश करण्याची मागणी केली आहे. तसंच हे गंभीर प्रकरण असल्याचं सांगत मान आणि केजरीवाल यांनी यावर उत्तर द्यावं अशी मागणीही त्यांनी केली. “जेव्हा तुम्हाला माहित आहे की माफियांना कोण चालवतंय, तर तुम्ही त्यांची नावं सांगत का नाहीत,” असा सवालही वाडिंग यांनी केला.
काय म्हणाले होते केजरीवाल?
“पंजाबला लुटणारे सर्व मोठे माफिया माझ्याकडे येऊ लागले आहेत. ज्यांना लाच देऊन संपर्क साधता येईल अशी तुमच्या पक्षात कोणती व्यवस्था आहे का असं ते मुख्यमंत्री मान, आमचे मंत्री, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी यांना विचारत आहे. आम्ही त्या सर्वांना प्रामाणिकपणे काम करण्यास सांगितलं आहे. तसंच ही बाब न मानल्यास तुरुंगात टाकण्यात येईल असा इशाराही दिला आहे,” असं केजरीवाल यांनी सांगितलं होतं.
आश्वासन पूर्ण
आम्ही निवडणुकीपूर्वी पंजाबला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे आणि पैशाची कमतरता राज्याच्या प्रगतीच्या मध्ये येऊ दिली जाणार नसल्याचंही केजरीवाल म्हणाले. मान यांनी पंजाबमधील प्रत्येक घरात मोफत ३०० युनिट वीज देण्याची घोषणा केली होती तेव्हा केजरीवाल यांनी हे वक्तव्य केलं.